कळंब ( शिवप्रसाद बियाणी )
नगरपालिकेकडून साडे तीन कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या स्मशानभूमीच्या कामाच्या निविदेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. नगरविकास विभागातील कक्ष अधिकारी यांनी सहा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना स्थगिती उठवल्याबाबतची पत्राद्वारे माहिती दिली. शहरातील आरक्षण क्रमांक 32/33 वरील शॉपिंग सेंटरच्या गाळे लिलावात 10 कोटी 50 लाख रुपये नगरपालिकेला मिळाले होते.
गाळे लिलावातून जमा झालेल्या अनामत रकमेतून शहरातील स्मशानभूमीचे आधुनिकीकरण करण्याचा ठराव दिनांक 31/08/2019 रोजी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. साडे तीन कोटी रुपयांची निविदा देखील या कामासाठी काढण्यात आली होती. मात्र पालिकेतील विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेनेचा याला आक्षेप होता. गाळ्याच्या लिलावातून जमा झालेल्या अनामत रकमेतून विकासकामे करू शकत नाही, म्हणून हा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना कार्यकर्ते विजय पारवे यांनी 28 ऑक्टर 2019 रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेत 18 डिसेंबर 2019 रोजी मंत्री महोदयांनी कळंब नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडून वस्तुस्थिती अहवाल मागवून घ्यावा व निर्णयासाठी सादर करावा, तोपर्यंत प्रकरण स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. त्यामुळे कळंबच्या विकासकामांना ब्रेक लागतो की काय अशी चर्चा शहरात सुरू होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद सुरू झाला होता. अंतीमतः काल दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी सदर कामावरील स्थगीती आदेश मागे घेण्यात आला आहे. तसेच या कामात वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.