उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयास 2020-21 करिता 260 कोटी 80 लाख रुपयांचा एकूण निधी बीडीएस प्रणालीवर प्राप्त झाला होता. त्यापैकी 73 कोटी 51 लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. 32 कोटी 52 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.हा सर्व प्राप्त निधी मार्च 2021 पर्यंत खर्च करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत, तर 2021-22 करिता 160 कोटी 80 लाख रुपयांच्या कमाल नियतव्यय मर्यादा देण्यात आली आहे. परंतु जिल्हयांच्या विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे दिला.

 जिल्हा नियेाजन समितीची बैठक येथील जिल्हा नियोजन सभागृहात आज पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली,त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस जि.प.च्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री तानाजी सावंत, राणाजगजितसिंह पाटील, कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले, सुरेश धस,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, यावेळी  श्रीकांत कुंटला यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे 2020-21 आणि 2021-22 ची माहिती दिली. तसेच सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बी.जी.अरावत आणि श्रीमती  प्रीतम कुंटला यावेळी उपस्थित होते.

 जिल्हयातील शेतकरी आत्महत्या अंतर्गत 2020 यावर्षातील एकूण  127 प्रकरणांपैकी 101 प्रकरणे पात्र करण्यात आली आहेत. तर  18 प्रकरणे अपात्र आहेत. 08 प्रकरणे कार्यवाही सुरु आहे.अपात्र 94 प्रकरणांचा फेरआढावा घेवून, प्रकरणापैकी  76 शेतकरी आत्महत्या प्रकरणे पात्र करण्यात आली आहेत. आत्महत्या प्रकरणांमध्ये संबंधितांच्या वारसाला प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात येते, अशी माहिती देऊन पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले की,  तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे, त्यास लवकरच मान्यता मिळवून दिली जाईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

 जिल्हयात यावर्षी 69 हजार शेतकरी पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत. केवळ 9890 शेतकरी अपात्र झाली आहेत. शासन निर्णय दि.29 जून 2020 नुसार,योजनेत सहभागी शेतक-यांनी 72 तासांच्या आत सूचना देण्यात यावी असे म्हटले आहे.तरच त्यात  बदल किंवा दुरुस्ती करण्याचे अधिकार केंद्र,सरकार स्तरावर आहेत. तथापि,राज्यशासन स्तरावर या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहेत,अशी माहितीही पालकमंत्री श्री.गडाख यांनी यावेळी दिली.

 जिल्हयात राज्यस्तरामधील 539  तलाव/कोल्हापुरी बंधारे इत्यादी आहेत. त्यापैकी 230 च्या दुरुस्तीचा कार्यक्रम टप्पाटप्याने हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव तरतूद केली आहे.यावर्षी जि.प.कडे 739 तलाव आहेत. या सर्वांच्या दुरूस्तीसाठी यावर्षी  पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नीति आयोगाकडे 7 कोटी  रुपयांची मागणी केली आहे, अशी माहिती देऊन श्री.गडाख म्हणाले की, महिला बाल विकास पोषण यासाठी साडेतीन टक्के निधी राखून ठेवली आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीमूळे  13 कोटी रु.निधी ग्रामीण रस्त्यासाठी राखीव केला आहे.याचे नियोजन करुन संबंधित यंत्रणांनी मंजुरीसाठी प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर भंडारा येथील दुर्घटनेनंतर जिल्हयातील आरोग्य विभागातील (फायर सुरक्षेसाठी) यावर्षी नियोजन करुन मंजुरी  तात्काळ घ्यावी. वाढीव लेबर रुमची आवश्यकता लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाना दिल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 जिल्हयात 2017-18-560 कोटी रुपये, 2018-19-732 कोटी रुपये,2019-20- 607 कोटी रुपये, तर  2020-21 वर्षात 1118 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. म्हणजे यावर्षी  सुमारे 14 टक्के अधिक पीक कर्ज वाटप केले आहे. वीज वितरण कंपनीस नवीन डिपीसाठी यावर्षी  15 कोटी  रुपये यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून तर तसेच पुढच्या वषीही 13 कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांच्या कृषी पंपांच्या वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. निती आयोगाकडेही यासाठी  मागणी  केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 राज्यशासनाने उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिली आहे.राज्यशासन या महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध करुन देणार आहे.केंद्र शासनाच्या पीपी (पब्लिक पार्टनरशीप) च्या सूचना आहेत.परंतु 100 विद्यार्थी आणि 420 खाटांचे शासकीय महाविद्यालय,उस्मानाबाद येथे होणारच  आहे. जागेची कुठलीही अडचण नाही. 25 एकर  जागा पूर्णपणे उपलब्ध आहे. त्यामुळे या महाविद्यालयासाठी जागेची आडचण येणार नाही, असेही सांगून पालकमंत्री श्री.गडाख यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देता यावाम्हणून  टोकन मणी  म्हणून प्रत्येकी  एक हजार रुपये ठेवण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेत सावंत यांनी केला सर्वांना विरोध 

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच आगमन झाल्यानंतर अामदार तानाजी सावंत हे ही सर्कीटहाऊस येथे आले. यावेळी सावंत यांनी आमदार, खासदार व शिवसैनिकांना मला पालकमंत्र्यांशी एकांतात बोलायचे आहे. आपण सर्व बाहेर जावा, असे सांगितले. सर्व बाहेर गेल्यानंतर जि.प.सदस्या अंजली शेरखाने यांचे पती नितीन शेरखाने यांनी पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी पक्षात प्रवेश केला. यावेळी बाहेर काढण्यावरून नितीन शेरखाने व सावंत यांच्यात तु-तू-मै-मै झाली त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत ही सक्षणा सलगर व नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी कृष्णा-मराठवाडा जलसिंचन प्रकल्पास जयंत पाटील यांनी मंजूरी देऊन निधीची उपलब्धता करून देण्याचे सांगितल्याने त्यांच्यासह आमदार, खासदार यांचा अभिनिंदनाचा ठराव घेण्याची सूचना केली. यावेळी तानाजी सावंत यांनी कोणाच्या ही अभिनंदनाचा ठराव घेण्याची गरज नाही, सर्व कामे मी केली आहेत. जयंत पाटील यांचा काहीही संबंध नाही, असे सांगून विरोध केला. त्यानंतर जि.प.चे माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील व नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्यातही हातलाई तलावावरील हक्क व परवानग्यावरून खटके उडाले.

 
Top