उस्मानाबाद/  प्रतिनिधी - उमरगा तालुक्यातील थोरलीवाडी येथे रविवारी सकाळी दहाच्या सुुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गटाच्या भांडणात एकाचा खून झाला आहे. हणमंत अर्जुन परसराम (वय 48) असे मृताचे नाव आहे.

थोरलीवाडी येथील रायप्पा खवडे याने गावातीलच गोविंद कोराळे याच्या गाडीला तलमोड या शेजारील गावाजवळ कट मारली. यानंतर गोविंद याने आरोपी रायप्पा यांच्या भावाकडे रायप्पा याने कट मारल्याची तक्रार केली. इतकेच निमित्त झाले व रायप्पाने गोविंदच्या डोक्यात कुर्‍हाड घालून गंभीर जखमी केले. ही माहिती गावात पसरताच दुसर्‍या गटाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. यात मयत हणमंत अर्जुन परसराम याच्या पायावर कुर्‍हाडीने वार झाला. तरीही हाणामारी सुरूच होती. यात हणमंत याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. उमरगा पोलिसांनी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  

निवडणूकीच्या कारणाची अफवा

ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली व त्यातूनच हा खून झाल्याची माहिती परिसरात पसरली होती. मात्र ही अफवा असल्याचे उघड झाले. गाडीला कट मारल्याचे क्षुल्लक कारण घडले व यात तलवार, कुर्‍हाडने झालेल्या हाणामारीत खून झाल्याचे समोर आले आहे.

 
Top