उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हयास 47 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन 180 साठवण तलावांचे बांधकाम करणार असल्याची घोषणा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी काल लोहारा तालुक्यातील वाडीवडगाव येथे केली.

 वाडीवडगाव येथील पाझर तलावाच्या दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर  हे होते. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लोहारा-उमरगा विधानसभा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले,जि.प.च्या सदस्या सौ.तिडके, जेवळीचे सरपंच मनोहरराव कवारे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हयात गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वाडीवडगाव येथे पाझर तलावाची पाणी पातळी  वाढून तो  फुटण्याची भिती निर्माण झाली होती त्यामुळे या तलावाच्या  सांडव्यातून तलावातील पाणी  कमी करण्यात आले.त्या अतिवृष्टीत या तलावाची दोन ठिकाणी  हाणी  झाली आहे.त्यामुळे भविष्यात या तलावात चांगला पाणी साठा होऊन त्यांचा उपयोग शेजारच्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी या तलावाच्या दुरूस्तीची मागणी आमदार चौगुले यांनी केल्यानंतर तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे,असे सांगुन पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले, की  जिल्हयात राज्यस्तरातंर्गत 539 पाझर तलाव, साठवण तलाव आणि कोल्हापुरी बंधारे आहेत. तर जिल्हापरिषदेच्या ताब्यातील 739 असे तलाव आहेत.त्यापैकी 230 तलावांची  या दोन वर्षात तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 2021-22 च्या जिल्हा नियोजनच्या आराखड्यात 31 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम राज्यशासनाकडून उपलब्ध करुन देऊन येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येईल.त्यामुळे जिल्हयात 22 हजार हेक्टर हे अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्माण होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 महत्वकांक्षी  ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’

 राज्यात मोठया प्रमाणावर पाझर तलाव,साठवण तलाव आणि कोल्हापूरी बंधाऱ्यांची कामे वेगवेगळया कालावधीत झाली आहेत. प्रामुख्याने 1972-73 च्या दुष्काळात मोठया प्रमाणात पाझर तलावाची कामे महाराष्ट्रात झाली.तसेच पेशवाई आणि ब्रिटिशांच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातही मोठया प्रमाणावर तलावांची कामे झाली. त्यापैकी अनेक तलावांची  मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. त्यांची साठवण क्षमता कमी  झाली आहे. यासर्व प्रकारच्या तलावांची दुरूस्ती करण्यासाठी राज्यभरात  मोठया प्रमाणावर विशिष्ट कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात या तलावाची दुरूस्ती करण्याची आवश्यकता व्यक्त केली गेली. त्या कामात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मला खास लक्ष घालण्यास सांगितल्याने  मीही त्याचा कालबध्द कार्यक्रम तयार केला आणि तो मुख्यमंत्र्यांना सादर केला. यातूनच ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’ साकार झाली आहे,असे सांगुन पालकमंत्री श्री. गडाख यांनी राज्यातील विविध प्रकारच्या तलावांच्या दुरूस्तीचा धडक कार्यक्रम हाती  घेण्यात आला आहे. त्यामुळे या तलावांच्या दुरूस्ती नंतर पुढील 25 ते 30 वर्षे पुन्हा दुरूस्ती करण्याची गरज भासणार  नाही. आता तलावांची दुरूस्ती करून ती ग्रामपंचायतीच्या आणि पाणी वापर संस्थांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. त्यामुळे त्याच्या देखभालीवर आणि पाण्याच्या नियोजनावर जनतेचेच नियंत्रण असेल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

 तलावांना मंदिराप्रमाणे जपा आपण आपल्या गावातील ग्रामदैवताच्या आणि इतर मंदिरांना प्राणपणाने जपतो. त्याची वेळोवेळी  दुरूस्ती  करतो, त्याची काळजी घेतो. आता आपल्याकडे कमी पावसाच्या परिस्थितीत पाण्याची साठवणूक आणि त्यातून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी तलावांना मंदिराप्रमाणे जपले पाहिजे. गावकऱ्यांनीच आपल्या परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांची जपणूक केली पाहिजेत,असे प्रतिपादनही श्री.गडाख यांनी यावेळी केले.

 वाडीवडगागव येथील पाझर तलावाचे सुमारे 25 वर्षापूर्वी काम झाले आहे.त्यामुळे या तलावाची दुरूस्ती करणे गरजेचे होते. या दुरूस्तीच्या कामावर 18 लाख 30 हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे. या पाझर तलावाची साठवण क्षमता 173.03 स.घ.मी आहे.   शीव रस्त्याच्या कामाचे उदघाटन वडगाव आणि फणेपूरच्या  ग्रामपंच्यातीच्या वतीने शीव रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचे उदघाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,लोहारा –उमरग्याचे उपविभागीय अधिकारी उदमले,वडगावचे सरपंच बबनराव फुलसुंदर,फणेपूरच्या सरपंच मुक्ताबाई भोजने आदी उपस्थित होते.


 
Top