उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यातील जनतेसाठी ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे रस्ते, शेती आणि पिण्यासाठी पाणी तसेच कृषी पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करण्यास राज्य शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. यासाठीच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी काल उमरगा येथे केले.

 उमरगा येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा श्री.गडाख यांच्या हस्ते पार पडला, तेव्हा ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे होते. तर यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अ.दि.कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अ.ज्ञा.सगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, केशव पाटील आदी उपस्थित होते.

 अतिशय सुंदर अशा विश्रामगृहाचे लोकार्पण करण्यात आले आहे. लोहारा-उमरगा तालुक्यात आमदार चौगुले यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची झाली आहेत. या शासकीय विश्रामगृहाच्या इमारर्तीच्या बांधकामांचेही त्यांचेच श्रेय आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले की, जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा फेर आढावा घेऊन त्यापैकी 76 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. या कामात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्य घातल्याने शेतकऱ्यांना मदत करणे शक्य झाले आहे.

 उमरगा येथील शासकीय विश्राम गृहात एकच चांगला सूट होता. कर्नाटक-आंध्रप्रदेशच्या सीमेवरील हे मोठे शहर असल्याने या ठिकाणी येणाऱ्या महत्वाच्या व्यक्तीच्या थांबण्याची गैरसोय होत होती, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दोन व्हीआयपी सूट, दोन इतर सूट आणि भोजनगृहाचे दोन कोटी 57 लाख रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आले आहे, असे सांगून राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी  राज्यातील सर्वच अनुसूचित जाती आणि जमातीच्या विधानसभा मतदार संघात वीज वितरणाशी संबंधित कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोहारा-उमरगा तालुक्यातही या योजनेत कामे होणार आहेत. 33 केव्ही ची नऊ सबस्टेशन प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे हे काम झाल्यानंतर या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना योग्य दाबाने वीज पुरवठा होईल, असा विश्वासही त्यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.

 अतिशय चांगल्या दर्जाचे सुसज्ज असे येथे विश्रामगृह झाले आहे. या तालुक्यात रस्त्यांची कामेही उत्तम झाली आहेत. आता जिल्हा प्रशासनाने शेत रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. या मोहीमेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा. शेतरस्त्यावरुन होणारी भांडणे थांबवावीत; असे आवाहन खा.राजेनिंबाळकर यांनी यावेळी केले.

 यावेळी नव्याने पात्र ठरलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांपैकी प्रतिनिधीक स्वरुपात तिघां महिलांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप, कृषी विभागातर्फे कृषी औजारे बँक संबंधी परवान्याचे आणि तुषार सिंचनच्या मंजुरीच्या आदेशाचे पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


 
Top