उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यामुळे नागरिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात तसेच काही कामानिमित्त बाहेर जात आहेत. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपली जुनीच पद्धत अवलंबवित मोबाईलसह घरातील कडी कोयंडा मोडून सोने व सार्वजनिक ठिकाणी लावलेली मोटरसायकल चोरून नेऊन नागरिकांचे दिवाळे काढले आहे. तर दिवाळीत चोरट्यांनी आपला धंदा तेजीत सुरू केला असून या चोरट्यांच्या मुसक्या तात्काळ आवळाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत असून या चोरट्यांनी पोलिसांसमोर खुले आव्हान उभे केले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सांजा चौकातील राजेंद्र विठ्ठल शिंदे  हे दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शहरातील आठवडी बाजारात गेले असता राजेंद्र शिंदे याच्यासह अन्य तीन व्यक्तींचे असे एकुण ४ मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेले. अशा मजकुराच्या राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भादंसं कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील मुलतान गल्लीतील रशिद फरीदसाब शेख यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने आज दि. ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तोडून घरातील कपाटातील १९ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख २६ हजार रुपये रक्कम असा एकुण ६३ हजार रुपयांचा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रशिद शेख यांनी दि. ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भादंसं कलम- ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तसेच उमरगा तालुक्यातील जेकेकुर येथील शिवाजी गुंडेराव बनसोडे यांनी त्यांची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. २५ एटी ३३१५ ही दि. २ नोव्हेंबर रोजी ३ वाजता उमरगा बसस्थानक येथे लावली होती. ती त्यांना ३.३० वाजण्याच्या सुमारास लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या शिवाजी बनसोडे यांनी आज दि.९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भादंसं कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top