उमरगा / प्रतिनिधी 

बेरड,बेडर,रामोशी या समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करणे यासह विविध मागण्याचे निवेदन शुक्रवारी (०९) जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने तहसीलदाराना देण्यात आले.

तहसीलदार संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बेडर, बेरड व रामोशी समाजाला भारतीयराज्य घटनेचे कलम ३४१, ३४२ नुसारच अधिकार प्राप्त झालेले असून सुध्दा मागील अनेक वर्षापासून याची अंमलबजावणी झाली नाही अनुसुचित जाती/जमाती सुधारित कायदा १९७६ची अंमलबजावणी राज्यात होत नाही या कायदयाचा संदर्भ लक्षात घेवून तत्काळ अंमलबजावणी करावी, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, रामोशी, बेरड, बेडर समाजाचा विकास आराखडा तयार करावा, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या चित्रपटास निधी देण्यात यावा, राजे उमाजी नाईक व शुरवीर बहीर्जी नाईक यांचा पाठ्यपुस्तकां मध्ये पूर्ण इतिहास समाविष्ट करावा, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचा निधी देण्यात यावा, बहीर्जी नाईकांचे नाव गुहागर-विजापूर राज्य महामार्गाला देण्यात यावे, रामोशी वतनी जमिन बिनशर्त परत मिळाव्यात आदी मागण्या निवेदनात केल्या असून समाजाच्या मागण्याबाबत ३१ तारखे पर्यंत सरकारने योग्य ती दखल घेतली नाही तर दोन नोव्हेंबर पासून राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर जय मल्हार क्रांती संघटनेकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष फुलचंद यंपाळे, नितिन कुकूर्डे, रायप्पा बोकले, अशोक मंमाळे, ॲड राजेंद्र मंडले, गोपाळ वासुदेव, चन्नवीर जमादार, परमेश्वर जमादार,शाहूराज जमादार, नागनाथ कोराळे,मनोज जमादार आदींच्या सह्या आहेत.

 
Top