उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावलं आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत-जास्त कर्ज काढावे, या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहेे. ते तुळजापूर येथे  सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 

रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर, लोहारा, उमरगा या तीन तालुक्यातील नुकसान झालेल्या शेताची व पिकांची पहाणी करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सोमवारी तुळजापूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर, पुणे, जिल्हयातील कांही तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. कांही ठिकाणी पिकांबरोबर जमीन व रस्ते ही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी पुर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. या अतिवृष्टीमध्ये सोयाबीन, ऊस व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले तर पुढल्या हंगामात दुसरे पिक घेता येईल,  परंतु जमिनीतील माती कांही ठिकाणी वाहून गेल्याने शेतकरी पुर्ण उद्ध्वस्त झाला आहे. अनेकांचे घरी पडली आहेत तर कांही जणांचे जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. याबाबत केंद्र सरकारशी आपण बोलून  मदतीसाठी प्रयत्न करणार आहोत भुंकपाच्या काळात राज्य सरकार ने केंद्राला प्रस्ताव देऊन व प्रेझेटेशन करून मदत मिळवली होती. त्याप्रमाणे याही वेळी काही कालावधी लागेल, असेही पवार यांनी सांगितले. पिकविम्याच्या बाबतीत कांही जाचक अटी विषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्या अटी शितील करून नुकसान भरपाई द्यावीच लागेल, असेही त्यांनी सांगितले. सिंचन विभागाच्या कांही प्रकल्पाचे नुकसान ही झाले आहे. त्यासाठी ही स्वतंत्र मदत निधी राज्य व केंद्र सरकार ने मिळुन निर्णय घ्यावा लागेल. कांही माध्यमांनी नेत्यांचा सुळसुळाट झाला, या संदर्भात प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल पवार यांनी सकारात्मक पहा असा सल्ला दिला. 

यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकराव चव्हाण, राज्यमंत्री संजय बनसोडे, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अामदार विक्रम काळे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर , आमदार सतिश चव्हाण, गोकूळ िशंदे, संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, नितीन बागल, माजी आमदार राहुल मोटे, प्रतापसिंह पाटील आदींची उपस्थिती होती. 

स्वाभिमान शिल्लक असेल तर राज्यपालांनी राजीनामा द्यावा

राज्यपाल हे देशातील महत्वाचे पद आहे, त्या पदाचा आदर राखने आवश्यक आहे. तसाच मुख्यमंत्री पदाचा ही आदर राखला गेला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघडणी केल्यानंतर स्वाभिमान शिल्लक असेल तर राज्यपालांनी पदावर रहाव का नाही हे ठरवाव, अशा शब्दात पवार यांनी टिका केली. 

मुख्यमंत्र्यांना आम्हीच सांगितले

कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला. इतर मंत्री फिल्डवर होते, आम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करत आहेत, अशी माहिती ही पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.  प्रतंप्रधान मोदी यांच्याशी मुख्यमंत्री ठाकरे यांचे याबाबत बोलने झाले आहे. राज्यातील मंदिराबाबत बोलताना पवार यांनी मंदिर बंद असल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याची कबुली देत याबाबत मुख्यमंत्री यांना माहिती देऊ, असेही सांगितले. 

खडसे यांचे योगदान मोठे 

भाजपा पक्ष उभारणीत माजीमंत्री एकनाथ खडसे यांचे योगदान मोठया प्रमाणात आहे. गेल्या २० ते २५ वर्षांत विरोधक म्हणुन त्यांनी चांगले काम केले आहे. परंतु त्यांच्या कामाची नोंद पक्षाने घेतली नसल्याचे सांगून खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार का ? यावर मात्र पवारांनी भाष्य टाळले. उस्मानाबाद जिल्हयातील राष्ट्रवादीचे कांही निकटवर्तीय भाजपामध्ये गेले आहेत. ते परत पक्षात येणार का ? या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पवारांनी आहे तेथे त्यांनी सुखी रहावे, त्यांना परत पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले. 


 
Top