भारतीय संस्कृतीतून आलेली त्याग, समर्पण आणि संन्यस्त वृत्ती हीच अभाविप पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. ते उस्मानाबाद येथे अभाविप पूर्णवेळ कार्यकर्ता निरोप स्वागत आणि शुभेच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अभाविप प्रदेशाध्यक्ष प्रा. सारंग जोशी , उद्योजक आणि लघुउद्योग भारतीचे उपाध्यक्ष श्री निशांत होनमुटे , अभाविप उस्मानाबाद शहर मंत्री नितेश कोकाटे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. पाचपोर पुढे म्हणाले की मी समाजाचा समाज माझा या भावनेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार अभाविप विविध कार्यक्रमातून करत असते. समाजा वरील आलेले कोणतेही संकटा साठी काम करणं ही माझी जबाबदारी असल्यामुळेच अभाविपचा कार्यकर्ता सेवाकार्यात भाग घेत असतो. भारतीय संस्कृतीसमोर प्रभू रामचंद्रांचा आदर्श आहे ,त्यांनी सर्व सुखे समोर असतानाही सर्वस्वाचा त्याग करून वचनपूर्ती साठी संन्यास घेतला. आद्यशंकराचार्यांनी भारत भ्रमण करून देशाच्या सर्व भागात शक्तिपीठे स्थापन केली. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण करून युवकांना उठा जागे व्हा ! ध्येयप्राप्ती पर्यंत थांबू नका , असे आवाहन केले. भारत मातेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे घरदार संसाराचा त्याग करून संन्यस्त वृत्तीने देशसेवा केली. त्या परंपरेतूनच अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात जाऊन कार्य करत असतात.
प्रास्ताविकात प्राध्यापक सारंग जोशी यांनी covid-19 काळात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला तर निशांत होनमुटे यांनी पूर्णवेळ काम करण्यासाठी जाणाऱ्या अंकिता पवार, अर्जुन बारंगुळे, प्रसाद जाधव ,साईराज टाचले या कार्यकर्त्यांना जीवनावश्यक वस्तू संचासह तुळजाभवानी ची प्रतिमा डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवन पटावरील विशेषांक यासह शुभेच्छा दिल्या.
आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घराबाहेर पडून पूर्णवेळ काम करण्याची परंपरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 1949 या स्थापना वर्षापासून सुरू ठेवली आहे याच परंपरेतून अभाविप उस्मानाबाद शाखेतून पुर्णवेळ निघालेले सहमंत्री कुमारी अंकिता पवार, राष्ट्रीय कला मंच चे काम करणारे प्रसाद जाधव , उमरगा येथील साई टाचले तर उस्मानाबाद येथील अर्जुन बारंगुळे या चार कार्यकर्त्यांना सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री संजय पाचपोर आणि अभाविप चे प्रदेशाध्यक्ष प्रा सारंग जोशी ,तसेच लघुद्योग भारतीचे उपाध्यक्ष निशांत होनमुटे यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.
याच कार्यक्रमात अभाविपचे उस्मानाबाद जिल्ह्यत पूर्णवेळकार्य करणारा कार्यकर्ता शिवाजी भावसार याचे कार्यक्षेत्र बदलल्यामुळे त्याला निरोप तर उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णवेळ कार्य करण्यासाठी आलेल्या गंगाधर कोलमवार याचे स्वागत करण्यात आले.