अवकाळी पावसाने सतत २२ तास हजेरी लावल्यामुळे सर्व जिल्ह्यातील नाले, ओढे व नदी तुडुंब व दुथडी भरून वाहत आहेत. या अवकाळीचा जबरदस्त तडाखा शेतकऱ्यांना बसला असून या पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड व अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवलेले आहे. त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसाच्या पाण्याखाली गेले आहे. तर ज्या ठिकाणी अति प्रचंड पाण्याचा प्रवाह सुरू झाला ते सोयाबीनचे ढीग पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुरात वाहून गेले आहेत. तर नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमीनी पाण्याच्या प्रवाहामुळे खरडून गेल्याने शेती क्षेत्र पूर्णतः ओसाड पडले आहे.
दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता सुरू झालेल्या पावसाने दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास विश्रांती घेतली. सतत २२ तास वार्यासह पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी उभी असलेली झाडे देखील उन्मळून पडली. या पावसाचा कहर जबरदस्त होता की अनेक नदी नाले ओढे धोक्याची पाणी पातळी ओलांडून ओसंडून वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर नदीकाठच्या गावात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली असून सर्व जीवनावश्यक साहित्य भिजल्यामुळे त्यांच्या पुढे मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. या पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाल्याने जिकडे पहावे... तिकडे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत होते. तर या पावसामुळे भाजीपाला वर्गीय पिकासह ऊस व फळबागा देखील जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे एक प्रकारे अंधकारच निर्माण झाला आहे.
सतत २२ तास पाऊस सुरू राहील्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक गावांमध्ये असलेली झाडे घरावर पडल्यामुळे अनेकांची घरे पडली आहेत तर शेतातील विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत प्रवाह खंडित होऊन संपूर्ण गावे अंधारात डुबली आहेत. या पावसाने दिलासा देण्याऐवजी सर्वत्र हाहाकार माजविणारी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याचे ढीग शेतातच झाकून ठेवलेले आहेत. मात्र वेळेवर ते भरडण्यासाठी मळणी यंत्र उपलब्ध न झाल्यामुळे ते या पावसात भिजले आहेत. तर अनेक शेतातच पावसाचे पाणी साचल्यामुळे शेततळे तयार झाले. व त्या तळ्यावर सोयाबिनचे ढीग तरंगत आहेत. तसेच ओढा व नदी असणाऱ्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या प्रवाह सोबत वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या ताटातील पिकविलेला घास या पुराने हिरावून नेला आहे.