उमरगा । प्रतिनिधी-
उमरगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ प्रेमलता टोपगे यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाची तयारी सुरू करण्यात आली आहे. अविश्वास ठरावाच्या अर्जावर सत्ताधारी काॅग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सहया केल्या आहेत. अविश्वास ठराव दाखल करावा किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल. विद्यमान उपनगराध्यक्षांचा राजीनामा घेऊन सर्वानुमते उपनगराध्यक्ष निवडून पालिकेचा कारभार चालवण्यात येईल अशी माहिती आहे.
उमरगा नगरपालिकेत काॅग्रेस व भाजपाची सत्ता आहे. काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. काॅग्रेसच्या तिकीटावर सौ. प्रेमलता टोपगे या जनतेतून नगराध्यक्ष पदावर निवडून आलेल्या होत्या. काॅग्रेसचे ८, भाजपाचे ७, शिवसेनेचे ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे एकुण २२ नगरसेवक आहेत. यापैकी २० नगरसेवकांच्या सहया झालेल्या असुन दोन नगरसेवक बाहेरगावी असल्याने आज बुधवारी होतील असा अंदाज आहे. काॅग्रेसने नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवला तरी त्यांना स्पष्ट बहुमताने हुलकावणी दिली होती. पालिकेत बहुमत नसलेल्या काॅग्रेसने निवडणुकीनंतर भाजपला उपनगराध्यक्षपद देऊन आघाडी केली. काॅग्रेस व भाजपाच्या युतीनंतर उपनगराध्यक्ष पदाची माळ भाजपाचे हंसराज गायकवाड यांच्या गळ्यात पडली होती. विविध विकास निधीची विभागणी, विविध टेंडर यासह विविध कारणावरुन चारही पक्षात सतत धुसफूस सुरू होती. निधी वाटपावरुन सर्वच पक्षात धुसफूस होऊन सतत गटबाजी दिसुन येत होती. नगरसेवकातील गटबाजीला नगराध्यक्षांचे पतीचा हस्तक्षेप हा मुद्दा अग्रस्थानी होता. याबाबत काॅग्रेससह भाजपाचे नगरसेवक वेळोवेळी वरीष्ठाकडे तक्रार करत होते. काॅग्रेस नेत्यानी एकत्र बैठका घेऊन सर्वानाच समज देत गटबाजी टाळून सर्वानी शहराच्या विकासासाठी संयमाने व धिराने घेण्याचा सल्ला देण्यात आला. पण मी जनतेतुन निवडून आलो आहे. कोणाकडे तक्रार करावयाची आहे ते करा. अशे वेळोवेळी बोलणे येत असल्याने अखेर सर्व नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांसोबत चर्चा करुन नगराध्यक्षावरच अविश्वास ठराव दाखल करण्यावर एकमत झाले. उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर नगराध्यक्षाना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे नाही ऐकले तर त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात यावा असाही मतप्रवाह दिसुन येत आहे. एक तर नगराध्यक्षाना रजेवर जावे लागेल अन्यथा त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होणार हे जवळपास निश्चित आहे.