अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सरसकट अतिवृष्टी मदत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी, (हेक्टरी ५००००/- पन्नास हजार रुपये) पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्याचे आदेश विमा कंपनीला देऊन आर्थिक मदत करावी व मराठा समाजाचा सरसकट ओ.बी.सी. प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील दोन-चार वर्षापासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे व बोगस बियाण्यांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त होता त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले. या हंगामामध्ये पिके चांगली आली होती परंतु अतिवृष्टीने सर्व पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडून हवालदिल झाला आहे. यामुळे शासनाने पंचनामे व ऑनलाईन अहवालाची मागणी न करता सरसकट हेक्टरी ५००००/- (पन्नास हजार रुपये) मदत म्हणून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. सरकार मधील मंत्री, आमदार, खासदार केवळ पंचनामे करण्याच्या नौटंकीमध्ये अडकून पडलेले आहेत मात्र सध्या शेतकऱ्यांना रोख स्वरुपाच्या मदतीची गरज आहे. तसेच पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश पिक विमा कंपन्यांना द्यावेत व शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात यावी, वरील मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अॅड. तानाजी चौधरी, आशिष पाटील, सुधाकर जाधव, आकाश मुंडे, दिनेश चौघुले, प्रदिप जाधव, विशाल सरडे, अदित्य देशमुख, शिवदास पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.