उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी (दि.७) शहरात फिरून नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच गर्दी न टाळल्यास बाजारपेठ उघडी ठेवण्याची वेळ पूर्वीप्रमाणेच दुपारी ३ पर्यंत करावी लागेल, असा इशाराही दिला. दरम्यान, सायंकाळी पाच वाजले तरी शहरातील बाजारपेठेत गर्दी दिसत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली.
जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता स्वत: फिरून बाजारपेठेतील गर्दी पाहिली. त्यानंतर त्यांनी स्वत: नागरिकांना तसेच दुकानदारांना नियमांची आठवण करून दिली. पाच वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यासाठी सवलत दिलेली आहे. मात्र,या सवलतीचा उद्देश गर्दी टाळणे हा होता. वास्तविक रस्त्यांवर अनावश्यक गर्दी वाढत असून, त्यामुळे कोरोनाचा नायनाट होण्याएेवजी प्रसारच होत असल्याची भीती आहे. जिजाऊ चौक ते सेंट्रल बिल्डिंग, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्यांनी फिरून नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क वापरा, असे आवाहन केले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीराम राठोड आदींसाह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
Top