उस्मानाबाद/ प्रतिनिधी
जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या कृष्णा खोऱ्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचे १९ टीएमसी पाणी लवकरात लवकर जिल्ह्याला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था करून देणे गरजेचे आहे.यासाठी आघाडी शासनाने जिल्ह्यासाठी कृष्णा-मराठवाडा योजनेतून २१ टीएमसी पाणी मंजूर केले. ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर जिल्ह्यातील ९२,१४१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी यापूर्वीही मी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे २१ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या योजनेंतर्गत एक टप्पा असलेल्या मोहळजवळील घाटणे बॅरेजचे काम पूर्ण झाले असून तेथे पंपहाऊस व उद्धरण नलिकेचे काम करून सदरील पाणी तुळजापूर, लोहारा, उमरगा या तीन तालुक्यात पोहचवणे आवश्यक आहे. याकरीता पंपहाऊन व उद्धरण नलिकेच्या कामाच्या निविदाही पार पडल्या होत्या. परंतु, नंतर त्या रद्द करण्यात आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने निधीची तरतूद करून दुष्काळी मराठवाड्यासाठी २१ टीएमसी पाणी पोहचवावे अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.