तुळजापूर / प्रतिनिधी -

नळदुर्ग येथील भुईकोट किल्यात असलेला   नर-मादी धबधबा मंगळवारी सुरु झाला आहे. माञ कोरोना पार्श्वभूमीवर किल्ला बंद ठेवल्याने नर-मादी वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटता येणार नाही. 

तुळजापूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे नळदुर्ग स्थित  कुरनुर मध्यम  बोरी प्रकल्प  भरून पाणी सांडव्‍यातून वाहण्यास आरंभ होताच नर-मादी धबधबा वाहण्यास आरंभ  झाला आहे. प्रथमता मादी धबधबा वाहण्यास सुरुवात झाली त्यानंतर नर धबधबा वाहू लागला आहे. नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्यातून बोरी नदी वाहते. या नदीवर बांध बांधून पाणी महल तयार करण्यात आला आहे. या पाणी महलामध्ये नर व मादी हे दोन  धबधबे तयार करण्यात आले आहेत.

किल्याच्या उत्तरेच्या बाजूने वाहत येणारी बोरी नदी किल्ल्याचा आत येऊन तिला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळवली आहे. पूर्व-पश्चिम असा हा बंधारा अतिशय कल्पकतेने परंतु भक्कम अशा तऱ्हेने बांधलेला आहे. बंधा-‍याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडव्यांना  नर व मादी अशी नावे देण्यात आली आहेत. यालाच नर-मादी धबधबा असे संबोधले जाते. पावसाळ्यात नदीला पाणी आले, की नर-मादी धबधफब्यातील पाणी पुढे १०० फूट खाली खोल जाऊन आदळते. ते सुंदर व विहंगम दृश्य पाहताना अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिटते.

 
Top