उस्मानाबाद/ प्रतिनिधी
दिव्यांग रसुल सय्यद हे दिव्यांग संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. त्यांचे निमंत्रण घेण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर जमिनीवर बसले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या साधेपणाची दिवसभर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
उस्मानाबाद नगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर झेरॉक्सचा व्यवसाय करत असलेले रसूलभाई सय्यद अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष आहेत. या संघटनेचा मेळावा १४ ऑक्टाेबर रोजी असून, याच दिवशी शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी ते सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. दिव्यांग बांधवाला पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कार्यालयात येऊ देण्याची परवानगी दिली. रसुलभाई दोन पायाने आणि एका हाताने दिव्यांग आहेत. ते एका हातावर चालत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते. त्यांना खुर्चीवर बसता येत नसल्याने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी त्यांची खुर्ची सोडली. रसुलभाई यांच्याजवळ मांडी घालून खाली बसून त्यांनी संवाद साधला.