कोरेानाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी सहकारी रुग्णालयाने ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांची गरज ओळखून नगरपालिकेने याला सोमवारी (दि.२८) विशेष सर्वसाधारण सभेत मंजूरी देऊन तुळजाभवानी रुग्णालयाने हॉस्पिटल उभारावे त्यासाठीचे मनुष्यबळ, दैनंदिन औषधी आदींचा पुरवठा नगरपालिकेने करण्याबाबतचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
नगरपालिकेची सोमवारी दुपारी १ वाजता नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विविध ७ विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी शहरासह जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या तुलनेत व्हेंटीलेटर बेड, आयसीयू बेड, ऑस्कीजन बेड आदींची गरज ओळखून या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तुळजाभवानी सहकारी रुग्णालयाच्या वतीने एक डेडीकेटेड केअर हॉस्पीटल उभारण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेकडे सादर करण्यात आला होता. या हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन बेडची व्यवस्था करून श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठीचा हा प्रस्ताव होता. या विषयावर पालिकेच्या सभेत चर्चा होऊन याकरीता आवश्यक यंत्रसामग्री व इतर उभारणी केल्यानंतर कोविडची साथ नियंत्रणात आल्यावर पुढे याचा पालिकेने उपयोग काय करायचा, डॉक्टर व आवश्यक बाबीची पालिकेने उभारणी कशी करायची आदींबाबत नगरसेवकांनी मत मांडले. या चर्चेअंती तुळजाभवानी सहकारी रुग्णालयाने सदरील डेडीकेटेड केअर हाॅस्पिटल (डीसीएच) उभे करायचे आणि लागणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, इतर मनुष्यबळ तसेच औषधांचा पुरवठा पालिकेने करायचा असा निर्णय घेण्यात आला. याकरीता महिला रुग्णालयाजवळील वसतीगृहाच्या जागेचीही चर्चा होऊन सुरुवातीला १० खाटांपासून याची सुरुवात करून पुढे त्या आवश्यकतेनुसार व उपलब्ध मनुष्यबळानुसार ५० खाटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.याचबरोबर स्वच्छ शहर अभियान-२०२१ अंतर्गत शहर कचरामुक्त शहर घोषित करणे, सर्वे क्र ४३ मधील मातोश्रीनगर येथील नागरिकांचा रस्ता मागणीबाबतच्या अर्जावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तसेच कचरा डेपोकडे जाणाऱ्या १८ मीटर रस्त्यासाठी बाधीत होणाऱ्या जमिनीचे संपादन करून त्यामोबदल्यात त्यांना टीडीआर देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
