उस्मानाबाद/ प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी शंकर सुर्यभान जाधव, (वय ५७ वर्ष रा.उस्मानाबाद) यास जन्मठेप व अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली सदरची शिक्षा तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती आर.जे.राय मॅडम यांनी मंगळवारी दि. २९ सप्टेंबर रोजी ठोठावली.

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत की, दि १०.६.२०१५ रोजी पिडीत फिर्यादी (वय १६ वर्षे)  हिने पो.स्टे. उस्मानाबाद ग्रामीण  येथे फिर्याद दिली की, आरोपीने त्याचे जुनोनी येथील शेतात माझे आई वडिलांना शेत मजुरी करण्यासाठी पत्र्याचे शेड मारून दिले होते. तेथे आम्ही दि १०. ०६.२०१५ रोजीच्या चार महिन्यापूर्वी राहण्यास होतो. माझे आई वडिल शेतात मजुरीसाठी गले असता मी एकटीच घरी राहत असे. घटनेच्या दिवशी दुपारी २ वा. आरोपीने त्याचे शेजारील घरी पिडीतेस बोलावले व पिडीतेस गोड बोलुन मोसंबी खायली दिली व तिला जिवे मारण्याची धमकी देवुन पिडीतेवर लैंगीक अत्याचार केले व सदरची घटना कुणाला सांगितली तर तुला व आई। वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही दोन वेळेस धमकी देवून जबरदस्तीन पिडीतवर लैंगीक अत्याचार केले. त्यानंतर काही दिवसांनी पिडीतेच्या आई वडिलांनी पिडीतेचा मासिक धर्म बंद झाल्याने सोनोग्राफी केली असता पिडीता ही चार महिण्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी पिडीतेच्या आई वडिलांनी पिडीतेस याबाबत विचारणा केली असता आरोपीने तिच्यावर लैंगीक अत्याचार केल्याचे सांगितले होते. त्यानंतर पिडीतेच्या आई वडिलांनी आरोपीस याबाबत विचारणा केली असता, पिडीतेचा गर्भपात करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणुन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.

सदरील फिर्यादीवरून आरोपीविरूध्द पो.स्टे. मध्ये भा.दं.वि. चे कलम ३७६, ५०६ व पोक्सो कायदयाचे कलम ४ व १२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक श्री.गावडे यांनी करून आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

सदर प्रकरणाचे तपासादरम्यान पिडीतेने एका मुलास जन्म दिला व सदरील मुलास मा. न्यायालयाचे आदेशाने बालकाश्रमात ठेवण्यात आले आहे. दरम्यान सदर मुलाचे पितृत्व सिध्द करण्यासाठी पिडीता, आरोपी व नवजात बालक यांचे डि.एन.ए. नमुने न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोन वेळेस पाठवण्यात आले, परंतु दोन्ही अहवालानुसार आरोपी हा पिडीतस जन्मलेल्या मुलाचा जन्मदाता पिता आहे हे सिध्द होत नव्हते.

वास्तविक पाहता सदर प्रकरणात दोन्ही डी.एन.ए. रिपोर्ट निगेटीव्ह होते. सदर घटनेमळे पिडीतेवर झालेल्या मानसिक धक्यामुळे पिडीता मा. न्यायालयात व्यवस्थीत साक्ष देवू शकत नव्हती. सुनावणी दरम्यान आरोपी फरार झाला होता. त्यामुळे सदरील खटला निकाली निघण्यास विलंब झाला आहे.

सदर प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती आर.जे.राय मॅडम यांचे न्यायालयात पुर्ण झाली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पैरवी कर्मचारी म्हणुन श्रीमती कोठावळे, महिला पोलीस नाईक यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात पिडीता, पिडीतेची आई, आरोपीची नातेवाईक महिला व पिडीतेची सोनोग्राफी करणारे डॉक्टर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

सदर प्रकरणात आलेला ठोस तोंडी पुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून आरोपी शंकर सुर्यभान जाधव, (वय ५७ वर्षे, रा. उस्मानाबाद) यास भादवि चे कलम ३७६ (एफ)(एन), ५०६ व पोक्सो कायदयाचे कलम ४ ६ नुसार दोषी धरून सदर आरोपीस जन्मठेप व अकरा हजार दंडाची शिक्षा सुनावली.


 
Top