उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील खून प्रकरणासह सहा वर्षापूर्वीच्या दरोड्यातील, मोक्का कायद्यांतर्गत हवा असलेल्या अरोपीसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून गजाआड केले. ही कारवाई रविवारी (दि.३०) पहाटे २ वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील कुन्सावळी शिवारात करण्यात आली.
विलास लक्ष्मण भोसले (रा. सिंदगाव, ता. तुळजापूर) यांचा सावत्र आई जयाबाई ( जेवळी, ता. लोहारा) यांच्याशी कौटुंबिक संघर्ष होता. यातून त्याने आपली मुले- किरण व अर्जुन यांच्यासहह जावई विशाल परमेश्वर शिंदे यांच्या मदतीने दि.७ मार्च २०२० रोजी रात्री जयाबाई यांना राहत्या घरी लोखंडी सळई, चाकु, भाल्याने वार करून ठार केले होते. तर आई सोबत असणाऱ्या संतोष पवार यांना गंभीर जखमी केले होते. गुन्ह्यानंतर सर्व आरोपी अटक टाळण्यासाठी बेपत्ता झाले होते. ते गावापासून दुर अंतरावर माळरानावर ते पाल टाकून राहत असत. त्यांचा ठावठीकाणा पोलिसांना वेळोवेळी मिळाला परंतु, पोलिस पथक पोहचण्यापूर्वीच ते तेथून पसार होत होते. या चौघा आरोपीपैकी विलास भोसले व विशाल शिंदे हे दोघे तुळजापूर तालुक्यातील कुन्सावळी शिवारात पाल टाकून राहत असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांच्या पथकास मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दगुभाई शेख, सपोनि आशिष खांडेकर, पोउपनि पांडुरंग माने यांच्यासह १२ पोलिस कर्मचारी व लोहारा पोलिस ठाण्याचे सपोनि चौरे व ८ पोलिस कर्मचारी अशा २४ सदस्यांच्या पथकाने कुन्सावळी शिवारातील पालावर दि.३० ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या सुमारास छापा टाकला. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच हे दोन्ही आरोपी पळून जाऊ लागले. यावर पथकाने त्यांचा पाठलाग करून आवश्यक बळाचा वापर करून त्यांना जेरबंद केले. यातील विलास भोसले हा वरील गुन्ह्यासोबतच तामलवाडी पोलिस ठाण्यातील २०१४ मधील खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यात तसेच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई पोलिसांपासून फरार होता. याच गुन्ह्यातील त्याच्या ३ साथीदारांना न्यायालयाने यापुर्वीच जन्मठेप सुनावली आहे.पोलिस पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन व अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
 
Top