उस्मानाबाद /प्रतिनिधी -
सोयाबीनसह इतर पिकावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून या प्रादुर्भावास रोखण्यासाठी  कीटक नाशकांची  फवारणी करावी व योग्य दक्षता कशी घ्यावी ? याविषयी कृषी रथाद्वारे संपूर्ण तालुक्यात जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले.
लोहाच्या तालुक्यातील हराळी येथे दि.१८ ऑगस्ट रोजी कृषि रथाचे पूजन लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलताताई रणखांब, जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, प्रगतिशील शेतकरी नितीन सूर्यवंशी व  रंजनताई हासुरे यांच्या हस्ते करून कृषि रथाला  हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना बिडबाग म्हणाले की, लोहारा तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवरील कीड रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने   शेतकऱ्यांमध्ये कीड रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी कृषी रथ तयार करण्यात आला आहे. कृषीरथ तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन सोयाबीनवरील कीड रोगाविषयी जनजागृती करणार असल्यामुळे त्याचा फायदा शेतकरी बांधवांना नक्कीच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषीरथ तालुक्यातील प्रत्येक गावी जाऊन माहिती पुस्तिका, ध्वनी संदेश याद्वारे जनजागृती करणार आहे.
सोयाबीनवरील किडीच्या नियंत्रणासाठी फ्लूबॅंडामाईड (३९.३५ टक्के मार्केट नाव टाकूमी किंवा फेम) २ मिली प्रति १० लिटर पाण्यात किंवा  थायोमिथॉक्झांम (१२.६ टक्के)+ लॅमडासायलेथ्रीन (९.५ टक्के) (मार्केट नाव आलीका) हे संयुक्त कीटकनाशक २ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी (पावर पंपाने फवारणी करताना औषधाचे प्रमाण अडीच पट वापरावे).
असे आवाहन त्यांनी केले.
यासोबतच सोयाबीन पिकावर व शेंगावर बुरशी किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास टेबुकोनाझोल१० टक्के + गंधक ६५ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची २० ग्राम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तर
सद्यस्थितीत तालुक्यातील सोयाबीन या पिकाची  परिस्थिती  चांगली दिसून येत आहे.  परंतु मागील पाच दिवसापासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि उद्या असणाऱ्या अमावस्यामुळे सोयाबीन  या पिकावर पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोयाबीनवरती लवकरात लवकर फवारणी करावी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास गावातील शेतकरी, कृषी विभागातील सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. सदर कृषी रथाचे नियोजन कृषी सहाय्यक शैलेश जट्टे व नागेश जट्टे यांनी केले.

 तालुक्यात २७ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन
खरीप ज्वारी-६१३, मका-५२३, तूर-५८९७, उडीद-४१४०, मूग-२८२५, सोयाबीन-२७८८७, इतर-६७२ एकूण-४२२५३ क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

 
Top