उस्मानाबाद/प्रतिनिधी-
दीड वर्षांपूर्वी बांधलेला व वर्षभरापूर्वी वापरात आलेला बायपास रोडवरील उड्डाणपूल कमकुवत झाला आहे. सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चौपदीकरणाचे हे काम आयआरबी या कंपनीने केले आहे. पुलाच्या छताचा काही भाग कोसळू लागल्यानंतर तातडीने हा पुल वाहतुकीस बंद करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
 सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे सोलापूर ते येडशी या ९० किलेामीटरच्या चौपदरीकरणाचे काम आयआरबी या नामांकित कंपनीने केले आहे. वर्षभरापूर्वीच या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मुंबईतून झाले होते.
 दरम्यान, उस्मानाबाद शहरातील सांजाचौक येथील उड्डाणपुलाच्या छताचा काही भाग शनिवारी (दि. २२) सकाळी कोसळत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे शहरातून सांजाकडे जाणारा मार्ग तर उड्डाणपुलावरील तुळजापूरकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली.
 सलग १० ते १२ दिवस मूसळधार पाऊस असल्याने या छताचा काही भाग कोसळू लागला आहे. दरम्यान, आयआरबी कंपनीचे इंजिनिअर, कर्मचारी, अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. गणपती आगमन आजच असल्याने या चौकात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने धाव घेत आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
 दरम्यान, या चौकातून वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. शहरात प्रवेश करतानाचाही हा प्रमुख चौक आहे. १० दिवसांच्या सलग पावसानेच या पुलाची ही अवस्था झाल्याने मोठा अनर्थ टाळण्यासाठी या पुलाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करुनच तो वाहतुकीला खुला करावा. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 
Top