उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मुगाच्या पिकावर विषाणूजन्य केवढा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बरोबरच मुगाची देखील पेरणी केलेली आहे. सध्या पिके फुल व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून यादरम्यानच पिवळ्या रंगाच्या विषाणूजन्य केवढा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाच्या वाढीवर तर परिणाम झालाच आहे. त्याबरोबरच फुल लागणे व शेंगा लागणे यावर देखील विपरीत परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हानात्मक संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुगाची पेरणी झाली असून पाऊस चांगला झाल्यामुळे सदरील पिकाची उगवण देखील चांगल्या प्रकारे झालेले आहे. मात्र मुगावर या विषाणूने आपला मोर्चा वळविला असून त्याचा थेट पिकाच्या उत्पादनावरच थेट परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे विविध संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोर दुष्काळात तेरावा टाकला आहे.
एकीकडे सोयाबीनचे बियाणे न  उगवल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे उगवलेल्या पिकावर निसर्गाचा प्रकोप होत असल्यामुळे शेतकरी गोंधळून गेले आहेत.
  किटकाचे वेळीच नियंत्रण करावे - बिडबाग
सध्या या पिकावर पिवळा विषाणूजन्य केवडा ( yellow mosaik of green gram)  या रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. हा रोग पांढरी माशी या कीटकांमार्फत पसरत असून या वाहक कीटकांचे नियंत्रण वेळीच केल्यास हा रोग पुढे पसरत नाही व नियंत्रणात येतो. या पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी डायमिथोएट ३० टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले.

 
Top