उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सद्यस्थितीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर राज्यातून, देशातून अथवा इतर जिल्ह्यातून नागरिक त्यांचे मूळ गावात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून व इतर राज्यातून, देशातून येणाऱ्या लोकांना तालुकास्तर व गाव पातळीवर संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बाहेरील जिल्ह्यातून व इतर राज्यातून, देशातून येणाऱ्या लोकांना 14 दिवसांसाठी तालुका पातळीवर निवडलेल्या संस्थामध्ये संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करणे, गावातील निवडलेल्या शाळा, धर्मशाळा, समाज मंदिर (स्वच्छतागृह इत्यादी व्यवस्था असणारे) इत्यादी  ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच विलगीकरण कक्षामध्ये दाखल केलेल्या नागरिकांना आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत दैनंदिन आरोग्य विषयक माहिती घेण्यात यावी.
नागरिकांच्या संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) कामाचे संनियंत्रण करण्यासाठी डॉ.बी.एस.खडके, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक कार्यालय, आरोग्य सेवा (कुष्ठरोग),उस्मानाबाद यांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे मुळ पदाचे काम सांभाळून, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयाने उपरोक्त कार्यवाही करावी. दैनंदिन माहिती घेवून एकत्रित माहिती  अनुप शेंगुलवार, नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचेकडे सादर करावा.
 तसेच परदेशातून उस्मानाबाद जिल्हयात येणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत भारत सरकारने निर्देशित केलेल्या SOP नुसार विदेशातून परत आलेल्या नागरिकांचे सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे स्वॅब घेण्याची व विलगीकरण करण्याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेश दिले आहेत. 
 
Top