उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 उमरगा तालुक्यातील भुसणी येथे असलेल्या लक्ष्मी मंदिराच्या नावाने गावात मोकाट सोडलेल्या गाईच्या वासराचे पाय मोडल्याप्रकरणी पोलिस पाटलांच्या फिर्यादीवरून गावातीलच एका विरोधात मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेवरून दोन गटात झालेल्या बाचाबाचीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी भुसणी गावाला भेट देऊन दोषी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही दिल्याने वातावरण निवळले.
भुसणी (ता. उमरगा) येथील नबीलाल मुस्थफा मुल्ला (२३) यांची गावालगत शेतजमीन आहे. शुक्रवारी सायंकाळी गावातील लक्ष्मी देवळाच्या नावाने घुळी सोडलेले गाईचे वासरू शेतात आल्याचे पाहून मुल्ला यांनी वासराला पिटाळून लावण्यासाठी दगड भिरकावून मारले. यात दगडाचा जबर मार लागल्याने वासराच्या मागील दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने दोन गटांत झालेल्या बाचाबाचीवरून गावात कांही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, मुरूम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर यांनी भुसणी गावाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच दोषीवर कडक कारवाई करण्याची ग्वाही देत शांततेचे आवाहन केले. दरम्यान, पोलिस पाटील गुलाब सुभाष हिरमुखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नबीलाल मुस्थफा मुल्ला याच्याविरोधात मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि आर. एम. जगताप यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
 
Top