उस्मानाबाद/प्रतिनिधी 
 ती सज्ञान असली तरी कुमारी माता होती. बाळंतपणासाठी ती रुग्णालयात दाखल झाली व नैसर्गिक प्रसूती झाली. परंतु, बाळ जन्माला येताच चक्क आईच म्हणाली, डॉक्टरसाहेब मला हे बाळ नको. त्याचा सांभाळ मी कसा करू, त्यावेळी एका नातेवाइकाने चाइल्ड लाइन उस्मानाबाद या संस्थेच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर चाइल्ड लाइनचे संचालक डॉ. दिग्गज दापके- देशमुख यांनी नवजात बाळाला आश्रय मिळवून दिला.
परिस्थितीपुढे माणूस अनेकदा पराभूत होतो, तसाच प्रसंग या मातेवर ओढवला असून, नऊ महिने पोटात सांभाळलेला हा मायेचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची वेळ तिच्यावर आली आहे. बाळ-बाळंतिणीची तपासणी केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, तिने बाळाला स्वीकारण्यास नकार दिल्यावर बाळाची जबाबदारी घ्यायची कुणी? असा प्रश्न तयार झाला. चाइल्ड लाइन उस्मानाबादला कळवल्यानंतर कायदेशीर माहिती घेतली. उस्मानाबाद बाल कल्याण समितीसमोर प्रकरण कायदेशीर सादर केले. शिशू सदन येथे बाळाची व्यवस्था करण्यात आली. आईच्या संमती व स्वाक्षरीसह बाळ नको अशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दत्तक विधान कायद्यानुसार शासकीय स्तरावर प्रक्रिया राबवून बाळाचे पुनर्वसन होईल. या नवजात असहाय्य बालकाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. दापके- देशमुख दिग्गज यांच्यासह उस्मानाबाद बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए. डी. कदम, सदस्य डॉ. कैलास मोटे, अॅड. आशा गोसावी, किशोर कोळगे, चाइल्ड लाइनचे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, दादासाहेब कोरके, रविराज राऊत, विकास चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 
Top