उस्मानाबाद / प्रतिनिधी
 येथील विद्यापीठ उपपरिसरात असलेल्या मायक्रो-बायोलॉजी विभागात कोविड-19 प्रयोग शाळेचे काम पुर्ण झाले असून आयसीएमआरच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याची मान्यता 20 जुलै पर्यंत येणे अपेक्षीत आहे. त्यानंतर प्रयोगशाळा कार्यान्वीत होईल अशी माहिती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी रविवारी (दि.12) दिली. कोविड-19 प्रयोग शाळे संदर्भात माहिती देताना श्री निंबाळकर म्हणाले, प्रयोग शाळा उभारणीसाठी एक कोटी दहा लाख खर्च झाले आहेत. प्रयोगशाळा सुरु झाल्यानंतर महिन्याला जवळपास पंधरा लाख रुपये येणारा खर्च जिल्हा नियोजन समिती देणार आहे. या प्रयोग शाळेत शंभर जणांच्या एकाच वेळी चाचण्या होणार आहेत. त्यामुळे रुग्णांच्या चाचणीचा अहवाल त्वरीत उपलब्ध होणार असल्याने त्यांचेवर उपचारही त्वरेने करण्यास मदत मिळणार आहे. ही जिल्हावासीयासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यास कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. दरम्यान विद्यापीठ उप-परीसरातील मुलींच्या वसतीगृहास विलगीकरणाचे स्वरुप देण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्हाशल्य चिकीत्सकासह भेट दिल्यानंतर रुग्णासाठी मुलींच्या वसतीगृहाची निवड केली. यावेळी विद्यापीठाचे जेष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर आणि उपपरिसराचे तत्कालीन संचालक डॉ. प्रशांत दिक्षीत यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे स्वॅब टेस्टींग प्रयोगशाळेचा प्रस्ताव मांडला. तर जिल्हा शल्यचिकीत्सकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत हे काम होत असल्याचे जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्रात नॉन मेडीको लॅबोरेटरीला उस्मानाबाद, औरंगाबाद, अमरावती या तीन ठिक़ाणीच परवानगी आहे. या लॅबचे संपुर्ण कामकाज विद्यापीठ प्रशासन सांभाळते. याच धर्तीवर जालना येथेही लॅब होण्याची शक्यता वर्तवीण्यात येत आहे. प्रयोगशाळा उभारणीसाठी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनास जिल्हाभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. देणगीदारांनी 66 लाख रुपयाच्या देणग्या दिल्या. जिल्ह्यातील उद्योजकांनी यंत्र सामग्री उपलब्ध करुन दिली. तर प्रयोगशाळेेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधेसाठी जवळपास सोळा लाख रुपये कुलगुरुंनी उपलब्ध करुन दिले आहेत. उस्मानाबादेत प्रयोगशाळेसाठी बायोकेमिस्ट्री लॅब आहे, विद्यार्थी आहेत मात्र रिपोर्टींगसाठी जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी दिल्यास प्रयोगशाळा सुरु होईल. या सर्व कामासाठी सरकारचा एकही रुपया घेतला नसल्याचे श्री निंबाळकर यांनी स्पष्ट केले. प्रयोगशाळा उभारणीसाठी जिल्हाधिकारी यांचा मोठा सहभाग असून विद्यापीठाने पुढाकार घेवून वीस लाख रुपये व जागा उपलब्ध करुन दिली. आणि प्रयोगशाळा पुर्णत्वास गेली. या प्रयोगशाळेत शंभर जणांच्या चाचण्या होणार असून आयसीएमआरच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. प्रयोगशाळेत कुशल कर्मचारी वर्ग आहे. औरंगाबादचे श्री खेडकर यांनी प्रयोगशाळा उभारणीसाठी मार्गदर्शन केले. सदरची प्रयोगशाळा मायक्रो बायोलॉजी विभागात आहे. प्रयोगशाळेसाठी इंटरनेटची स्पीड 100 एम बी पी एस असल्याने याबाबत जिओच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु आहे.
प्रयोगशाळा एमआयडीसी परिसरात असल्याने विजेच्या समस्येबाबत जिल्हाघिकारी यांनी वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले असून वीजेची समस्या 14 जुलै पुर्वी सुटण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. प्रयोगशाळा उभारणीत जिल्हाधिकारी, कुलगुरु, संजय निंबाळकर, प्राचार्य जयसिंग देशमुख, डॉ.डी.के. गायकवाड, डॉ. प्रशांत दिक्षीत, डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. के. पी. हाऊळ, डॉ. जे.ए. कुलकर्णी, विष्णु कर्‍हाळे, पी.आय. आळंगे, हेमंत कांबळे, धनराज सोमवंशी, विठ्ठल कसबे आदींनी प्रयत्न केले.
स्वॅब घेणे म्हणजे काय ?
 पडजिभेच्या मागे घशातील स्त्राव घेणे म्हणजे स्वॅब घेणे या स्वॅबची टेस्ट घेतली जाते या टेस्ट मध्ये कोरोना विषाणूचे किती प्रमाण आहे. त्याची संख्या येते खउचठ च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे दोन प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात पहिली चाचणी ज्याच्या मध्ये कोरोना कोविड-19 पॉझिटिव्ह म्हणजे ज्यामध्ये विषाणूची संख्या जास्त असते तर कमी विषाणूची संख्या म्हणजे निगेटीव्ह टेस्ट आणि ज्यामध्ये विषाणूचे प्रमाण कमी त्या त्यास इनक्न्लुजीव असे म्हणतात. चाचणी मध्ये सर्वात प्रथम स्वॅब घेणे त्यानंतर आर. एन. ए. चे विलगीकरण   करणे विषाणू असल्याची खात्री करणे व अहवाल तयार करणे या प्रमुख बाबी कोरोना चाचणी केंद्रात केल्या जातात. कोरोना-कोविड-19 ची लागण झाल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशीचे स्वॅब टेस्ट हे चांगल्या प्रकारे येतात.
 
Top