उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन  दि. 31 जुलै, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या लॉकडाऊन मधील निर्बंधाची  सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे  (Easing of restrictilons and phase wise opening of lockdown Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
जिल्ह्यातील उमरगा नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची  कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी  कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी  उमरगा नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाले असल्याची खात्री झाल्यामुळे जिल्हादंडाकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3), साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती  व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपूर्ण उमरगा नगर पालिका क्षेत्रात (औद्योगिक वसाहत क्षेत्र वगळून) दिनांक 6 जुलै, 2020 च्या 00.00 वाजेपासून ते 10 जुलै, 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
या कालावधीत नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून संचारबंदी लागू केली आहे. सर्व किराणा दुकान चालू राहतील. सर्व दवाखाने, मेडिकल, चष्मा दुकाने, पशुवैद्यकीय सेवा चालू राहतील. अंडी, मटन, चिकन, दुध व दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळ विक्री करणारे व संबंधित वाहतुक करणारे व इतर अत्यावश्यक सुविधा चालू राहतील.  कृषी संबंधित कामे, सर्व आस्थापना (किटकनाशक औषधे, बियाणे, शेती अवजारे व इतर) चालू राहतील व संबंधित वाहतुकीस परवानगी राहील. या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे. मुख्याधिकारी नगर परिषद उमरगा यांनी भाजीपाला विक्रेत्यांना गलोगल्ली  फिरुन भाजी विक्री करणेस सूचित करावे. तसेच एका भाजी विक्रेत्यास एक गल्ली  देण्यात यावी.  तो विक्रेता दुसऱ्या गल्लीमधे येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सर्व बांधकामे सुरु राहतील. बांधकामावर सर्व मजुरांनी मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे. जार, वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारव्दारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामधे पाणी दयावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे. किंवा जार, वॉटर स्पलायर्स यांनी संपुर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार, वॉटर सप्लायर्स कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्रा आधारे परवागनी राहील. घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे. फिरते दुध विक्रेते यांच्यामार्फत घरपोच दूध, दूध पाकीटांची विक्री, वितरण करता येईल. परंतु एका ठिकाणी उभे राहुन दूध विक्री करता येणार नाही. घरपोच दूध, दूध पाकिटे वाटपाच्यावेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 पर्यंत राहील. सर्व बँकेचे कामकाज व मिनी ATM सुरु राहील. सर्व प्रकारची माल वाहतूक व त्यानुषंगाने उमरगा नगर पालिका क्षेत्रात गोदामे चालविण्यास परवानगी देण्यात येत आहे, त्यानुषंगाने त्या आस्थापनांनी हमालांना ओळखपत्र उपलब्ध करुन द्यावीत. वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालू राहतील. सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे, विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील. प्रमुख अपर जिल्हा न्यायालय व सत्र न्यायाधीश उमरगा येथील न्यायालयीन कामकाजास परवानगी राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहील. सदर ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे.  उमरगा नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापि, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी wew.covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. उमरगा नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप,सर्दी,खोकला,डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.
विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील. अंत्यविधीसाठी शासनाचे आदेशात नमूद केल्यानुसार नियमाप्रमाणे परवानगी राहील. पेट्रोल, डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी  करुनच पेट्रोल , डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल, डिझेल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राआधारे परवानगी राहील. औद्योगीक वसाहतीमधील कारखान्यांमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, व्यक्तींना ओळखपत्र देण्याची जबाबदारी त्या त्या आस्थापनेची राहील. तसेच त्यांची वाहतूक ठरलेल्या ठिकाणी करण्याची सोय संबंधित कंपनीने करावी. प्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही धार्मिक यात्रा, मेळावे, विविध प्रकारचे प्रदर्शने, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे.या आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.

 
Top