सोलापूर  / प्रतिनिधी-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा घोड्यावरील मोठा पुतळा उभारण्याचा निर्णय स्मारक व अध्यासन केंद्र समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त समिती सदस्यांची बैठक मंगळवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पार पडली. या बैठकीस अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज इंदोर संस्थानचे राजे भूषणसिंह होळकर, खासदार डॉ. विकास महात्मे, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, धनगर माझाचे संपादक तथा पुण्यश्लोक फाउंडेशन चे अध्यक्ष धनंजय तानले, कुलसचिव डॉ. विकास घुटे, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा हे सदस्य उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर यांचाही समितीमध्ये आजच्या बैठकीत समावेश करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक व अध्यासन केंद्र समितीची पहिलीच बैठक झाली. याविषयी माहिती देताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा घोड्यावरील पुतळा उभारण्याचा निर्णय झालेला आहे. यासाठी देशातील नामवंत आर्किटेक व शिल्पकारांना बोलवण्यात येणार आहे. भूषणसिंह होळकर यांनीही यासाठी मदत करण्याचे सांगितले आहे. पुतळा परिसर सुशोभीकरण तसेच अँफी थिएटर देखील त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. अध्यासन केंद्रामध्ये अहिल्यादेवींचे ग्रंथ व संशोधन कार्य चालणार असल्याचेही कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले. त्यादृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्या म्हणाल्या.
निधीसाठी आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे अहिल्यादेवींचा घोड्यावरील मोठा पुतळा उभारण्यासाठी तसेच अध्यासन केंद्र निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. विद्यापीठ, शासन तसेच समाजातील दानशूर संस्था व मंडळींकडून हा निधी गोळा केला जाणार आहे. लवकरच यासाठी स्वतंत्र खाते उघडण्यात येईल. समाजातील सर्वांचे योगदान घेऊन एक चांगले कार्य पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
 
Top