उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उद्योगांप्रमाणे राज्यातील तीर्थक्षेत्र देखील लाखो लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देतात. प्रार्थनास्थळावर पुजारी, गुरव, जंगम, हारवाले,पूजेचे साहित्य, प्रसाद विकणारे, छोटे मोठे दुकानदार, विक्रेते, अगदी पार्किंगपासून ते सुरक्षारक्षकपर्यंत अनेक लोकांची उवजीविका अवलंबून असते.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गेली ३ महिन्यांपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद असल्याने लाखो नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने
तुळजापूरसह राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं  १ जुलै पासून उघडण्यास परवानगी द्या असे साकडे आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. प्रार्थना स्थळी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्यामुळे लोकांमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन होत नाही. परिणामी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका संभवतो. या बाबींचा विचार करुन सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
केंद्र सरकारने ८ जूनला अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्प्यात अटी शर्तींसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी दिल्यावर महाराष्ट्र वगळता देशभरातील इतर राज्यातील  प्रसिद्ध शबरीमला, बालाजी, वैष्णवदेवी, केदारनाथ, गंगा स्नान अशी मोठी देवस्थाने चालू झाली आहेत. माञ महाराष्ट्रातीली प्रार्थनास्थळे अद्याप बंद आहेत.
उद्योगांकडे रोजगरनिर्मितीची केंद्र म्हणून पाहिलं जातं मात्र उद्योगांप्रमाणे राज्यातील तीर्थक्षेत्र देखील लाखो लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देतात. प्रार्थनास्थळावर पुजारी, गुरव, जंगम, हारवाले,पूजेचे साहित्य, प्रसाद विकणारे, छोटे मोठे दुकानदार, विक्रेते, अगदी पार्किंगपासून ते सुरक्षारक्षकपर्यंत अनेक लोकांची उवजीविका अवलंबून असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यातील इतर प्रार्थना स्थळांसोबत तुळजापूर स्थित महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील गेली ३ महिन्यांपासून बंद असल्याने याठिकाणी पूजेला लागणारे साहित्य व फुलहार विक्री करून ज्यांची गुजराण चालते अशा हजारो नागरिकांच्या हातातोंडाशी येणारा घास बंद झाला आहे. भाविकांचा ओघ बंद असल्याने हाताला इतर कुठलेही काम नाही. त्यामुळे पैशांची येणारी आवक पूर्णपणे मंदावली आहे.दैनंदिन खर्चात कुठलीही बचत करता येत नसल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे व राज्यभरातील इतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पण अशीच परिस्थिती असल्याचे आ.पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
इतर राज्यांनी ज्याप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउन मुळे प्रभावित झालेल्या घटकांना आर्थिक स्वरूपात मदत केली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कांहीही मदत केली गेली नाही याचा उल्लेख करत त्यांनी एकप्रकारे सरकारच्या धोरणात बोट ठेवत आ.पाटील यांनी श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचा विश्वस्त या नात्याने तुळजापूर शहर व परिसरातील भोपे,पाळीकर,व्यापारी व इतर प्रभावित होणाऱ्या सर्व घटकांनी संपर्क साधत मंदिर बंद असल्याने त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या अडचणींची मांडल्या असल्याची माहिती दिली आहे. या अनुषंगाने आ.पाटील यांनी या सर्व घटकांशी चर्चा केली असता त्यांनी सरकार जे नियम व अटी घालून देईल त्याचे काटेकोरपणे पालन करु मात्र आमची उपजीविका चालू रहावी यासाठी मंदिर उघडा अशी भावना व्यक्त केली असल्याचे देखील मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
राज्यात अनलॉक-१ नंतर सरकारने अटी व नियमांसह ८० ते ९० % व्यवहार चालू करण्यास परवानगी दिली आहे.उद्योगावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांचा विचार करून उद्योगांना देखील चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.मग राज्यातील धार्मिक स्थळं देखील लाखोंच्या उपजीविकेचे साधन असताना फक्त त्यांनाच बंद ठेवने कितपत योग्य आहे ? असा प्रश्न आ.पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध देवस्थान व्यंकटेश्वरा मंदिर (तिरुपती बालाजी) ११ जूनपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले असून मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेची सर्व खबरदारी घेवून  भाविकांना आत प्रवेश दिला जात आहे.ऑनलाईन नोंदणीद्वारेच दर्शनाचा लाभ देण्यात येत असून गर्दी टाळण्यासाठी रोज केवळ ५००० भाविकांनाच दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे.भाविकांना नोंदणी केल्यावर दर्शनाचा दिवस त्यादिवसातील वेळ कळवण्यात येते आणि आपल्या वेळेच्या १ तास आगोदर मंदिर परिसरात येण्याची परवानगी देण्यात येते.
यासोबतच खबरदारी म्हणून दर्शनासाठी येतांना भाविकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला असून. भाविकांना रांगेत उभे राहण्यापूर्वी सॅनिटाइझ होणे बंधनकारक केले आहे. देवस्थानने मंदिर परिसराचे स्पर्श-मुक्त परिसरात रुपांतर केले आहे. भाविक रांगेत आल्यानंतर, कोणत्याही गोष्टींसाठी त्यांना कुठेही स्पर्श करावा लागणार नाही याची दक्षता घेण्यात येते तसेच भक्तांना रांगेत ५ ते ६ फुटांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे.
संकटकाळात नागरिकांना धार्मिक स्थळं मानसिक शांती सह जगण्यासाठी ऊर्जा व बळ मिळवून देतात.सध्याच्या संकटकाळात नागरिकांच्या भावनेचा विचार करून व देवस्थान असलेल्या परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर,सुरक्षात्मक उपाययोजना व नियम कठोर करून श्री.तुळजाभवानी मंदिरसह  राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं १ जुलै पासून उघडण्याबाबत परवानगी द्यावी तसेच सर्व प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापन मंडळाला आपले प्रार्थना स्थळ भाविकांसाठी खुले करण्यासाठी पूर्व तयारी करता यावी यासाठी तातडीने याबाबत नियमावली जाहीर करावी अशी मागणी आ.पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे
 
Top