उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्रातील उस्मानाबाद सारख्या कमी दरडोई उत्त्पन्न असलेल्या जिल्ह्यात रोजगार निर्मिती वाढविण्याच्या अनुषंगाने कौडगाव, उस्मानाबाद येथील औद्योगिक क्षेत्रात (MIDC) महाजनकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाच्या नजीक उपलब्ध जमिनीवर २५० मेगावॅटचा हायब्रीड सोलर-थर्मल उर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यासाठी ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांनी पुढाकार घेऊन संबंधितांना निर्देश द्यावेत  अशी मागणी केली आहे.
 उस्मानाबाद जिल्हयाचा मानव निर्देशांक कमी असून निती आयोगाने निवडलेल्या देशातील ११५ आकांक्षित जिल्हयामध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. जिल्ह्यात साखर कारखान्याव्यतिरिक्त एकही मोठा उद्योग नाही. जिल्ह्याचे अर्थकारण केवळ शेतीवर अवलंबून आहे. अनेक वर्षे सलग कमी पर्जन्यमान, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्याचे प्रमाण वाढणे अशा अनेक संकटाना सामोरे जात येथील शेतकरी उभा आहे. अशातच गेली अनेक महिने कोविड-१९ सारख्या महामारीने जिल्हा, राज्यच नव्हे तर देशाबरोबर अख्या जगाला हैराण केले आहे. यामुळे सर्वच घटकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अनेक तरुण आपापल्या गावी परत आलेले आहेत. अशा परिस्थितीत औद्योगिकरण होऊन येथील लोकांसाठी रोजगार निर्मिती होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे येथे रोजगार निर्मिती वाढविण्याच्या अनुषंगाने सोलर पॅनेल उत्पादन, टेक्सटाईल पार्क, उपकरण निर्मिती आणि इतर उत्पादन उद्योग आणणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात वर्षातील अंदाजे ३०० दिवस स्वच्छ सुर्यप्रकाश उपलब्ध आहे व सरासरी रेडीएशन ५.७७ kWh/m2/dayआहे. याअनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सौर उर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणे शक्य आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात औद्योगिकरणाला चालना मिळावी म्हणून २००७ साली उस्मानाबाद शहराजवळ कौडगाव येथे २५०० एकरावर औद्योगिक वसाहत उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कौडगाव येथील औद्योगिक क्षेत्रात १५०० एकर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून यातील जवळपास ११८ हेक्टर जमिनीवर महाजनकोच्या माध्यमातून ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तर १००० एकर जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात आहे. उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या योजनेतून या एमआयडीसी क्षेत्राला १ एमएलडी पाणी देण्याबाबतचा करार करण्यात आलेला आहे. उच्च दाबाची वीज वाहिनी व रिलायन्स गॅसलाईन याच क्षेत्रातून पुढे जाते. तसेच उस्मानाबाद रेल्वे स्टेशन व हवाई धावपट्टी देखील जवळच आहे.
 राज्यात महानिर्मिती आणि एनटीपीसीच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी महानिर्मितीने जागेचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश आपण दिल्याचे समजते. जिल्ह्यातील स्वच्छ सुर्यप्रकाश व रिलायन्स गॅस लाईनच्या उपलब्धतेमुळे येथे हायब्रीड सोलर-थर्मल उर्जा प्रकल्प उभारणे उचित राहील. जगामध्ये सोलर-थर्मल तंत्रज्ञानाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल त्यावेळी गॅसच्या माध्यमातून उर्जा निर्मिती करणे शक्य होईल तसेच विजेच्या सर्वोच्च मागणीच्या काळात गॅसच्या उपलब्धतेमुळे जास्तीची वीज उत्पादित करून ग्राहकांना देता येऊ शकते. यामुळे २४ तास हा प्रकल्प कार्यान्वित राहून मोठ्या प्रमाणात उर्जा निर्मिती करता येऊ शकेल.
 कौडगाव औद्योगिक क्षेत्रात तीन टप्प्यात एकूण २५०० एकर जमीन संपादित करण्यात येत आहे. त्यापैकी जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उत्पादन उद्योगासाठी अंदाजे १००० एकर व काही क्षेत्र प्रकल्पग्रस्त भूधारकांसाठी राखीव ठेवण्यात यावा व शिल्लक जागा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी औद्योगिक क्षेत्राकडून महानिर्मितीने मागणी करावी. कौडगाव, उस्मानाबाद येथील उपलब्धतेच्या अनुषंगाने राज्यातील २५०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणीच्या योजनेमध्ये कौडगाव, उस्मानाबाद येथे २५० मेगावॅटचा हायब्रीड सोलर-थर्मल उर्जा प्रकल्प प्रास्तावित करणे उचित राहील.
 त्यामुळे महाराष्ट्रातील उस्मानाबाद सारख्या कमी दरडोई उत्त्पन्न असलेल्या जिल्ह्यात रोजगार निर्मिती वाढविण्याच्या अनुषंगाने कौडगाव, उस्मानाबाद येथील औद्योगिक क्षेत्रात महाजनकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाच्या नजीक उपलब्ध जमिनीवर २५० मेगावॅटचा हायब्रीड सोलर-थर्मल उर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यासाठी ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांनी पुढाकार घेऊन संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.

 
Top