उस्मानाबाद /प्रतिनिधी-
रस्ता कामासाठी परवाना दिलेल्या मर्यादेपेक्षा अतिरीक्त तब्बल ४१ हजार ६२ ब्रास गौण खनिजचे उत्खनन केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील एेश्वर्या कन्स्ट्रक्शन व एस.बी.इंजिनिअर्स या दोन कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करून सदरील रक्कम वसुलीची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ-मुंडे यांनी उस्मानाबाद व कळंब तहसीलदार यांना दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एेश्वर्या कन्स्ट्रक्शन कंपनी औरंगाबादकडे जिल्ह्यातील कळंब ते लातुर रस्त्याचे तर एस.बी. इंजिनिअर्स औरंगाबाद या कंपनीकडे उस्मानाबाद – बेंबळी- उजनी या रस्त्याच्या कामासाठी गौणखनिज पुरविण्याचे काम होते. याकरीता एेश्वर्या कन्स्ट्रक्टशने प्रशासनाकडून २१ हजार ५०० ब्रॉस उत्खननाची परवानगी घेऊन तेवढीच रॉयल्टी भरलेली असताना प्रत्यक्षात मात्र ३९,५६९ ब्रॉय उत्खनन केले. तर उस्मानाबाद-उजनी या रस्त्यासाठी एसबी इंजिनिअर्सने ११ हजार ५०० ब्रॉस उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात ३४,४९३ ब्रॉस गौण खनिजाचे उत्खनन केले. अशा प्रकारे दोन्ही कंपन्यांनी मिळून एकूण ४१ हजार ०६२ ब्राॅस अतिरीक्त गौणखनिजाचे उत्खनन केल्याचे समोर आले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी दि.१९ जून रोजी याप्रकरणी कळंब व उस्मानाबाद तहसीलदार यांना नोटीस बजाऊन सदरील कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करून या रक्कमेची वसुली करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दंडाची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात असून खरंच ती वसूल होणार की केवळ कागदी कारवायांमध्येच प्रक्रीया रेंगाळणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

 
Top