धाराशिव (प्रतिनिधी)-सध्या खरीप हंगाम सुरु असून पावसानेही चांगली साथ दिली आहे पण बँकाकडून कर्ज पुरवठा करण्यात सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना व अधिकारी यांना समोरासमोर घेऊन अडचणी सोडविण्यासाठी बँक अधिकारी यांची बैठक आयोजित केल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडे याबाबत आढावा घेण्यासाठी सूचना केली होती त्यानुसार कळंब व धाराशिव या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही बैठक बोलाविली आहे. धाराशिव व कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप आढावा, शासनाच्या विविध योजनांचे कर्ज प्रस्ताव मंजुरी बाबत अडचणी येत असल्याचे दिसत आहे. आढावा घेण्यासाठी कळंब तालुक्यातील सर्व बँकेचे शाखा व्यवस्थापक, संबंधित अधिकारी, क्षेत्र अधिकारी व प्रतिनिधी यांची उपस्थिती असणार आहे. कळंब येथे (ता.22) रोजी पंचायत समिती सभागृहात ही बैठक होईल. तसेच धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी (ता.23) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी नियोजित ठिकाणी आपल्या अडचणी असतील तर उपस्थित राहावे असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.