उस्मानाबाद /प्रतिनिधी-
वाशी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षकाने गांजा तस्करीतील कारवाईतून मिळणाऱ्या अपेक्षेच्या नशेपायी थेट पाच पोलिस ठाण्यांची हद्द ओलांडून नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अणदूर येथे गांजा तस्करावर कारवाई केली होती. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी वाशीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डेसह तुळजापूरच्या उपविभागीय कार्यालयातील पोलिस नाईक रवी राऊत अशा दोघांना निलंबित केले अाहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाशी पोलिस ठाण्यात नव्याने बदली होऊन गेलेले गणेश झिंजुर्डे हे पूर्वी तुळजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तेथून वाशीला बदली झालेली असताना त्यांनी वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता दि.१७ जूनच्या मध्यरात्रीनंतर ते दि.१८ जूनच्या पहाटेदरम्यान नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अणदूर येथे एका अलिशान कारमधून नेण्यात येत असलेला गांजा पकडला होता. परंतु, या कारवाईदरम्यान कारमध्ये नोंदीला आलेल्या दोन आरोपींसह अन्य एक महिला आरोपीही असल्याचे कळते. परंतु, तीला या प्रकरणात नोंदीला न घेता सोडून देत दोघांना अटक दाखवून याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला. खळबळजनक बाब म्हणजे ही कारवाई झिंगुर्डे यांनी तुळजापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात संलग्न असलेल्या पोलिस नाईक रवी राऊत याच्या सहकार्याने केली असताना प्रत्यक्षात मात्र पोलिस दप्तरी ही कारवाई उपविभागीय अधिकारी टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत, तुळजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे वाचक- सपोनि रोडगे, नायब तहसीलदार भारती आदींनी केल्याचे नोंदविण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात कारवाई झिंगुर्डे यांनी केल्याचे समोर येत असल्याने या इतर अधिकाऱ्यांचा यामध्ये काय सहभाग असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या या प्रकरणाची उमरगा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणात आणखी कोणा-काेणाचा सहभाग आहे याकडे व चौकशी अहवालाकडे लक्ष वेधले आहे.

 
Top