गोविंद पाटील /प्रतिनिधी-
सर्वत्र कोरोनाने जोरदार थैमान घातलेले असताना शिक्षकांना आपल्या शाळेतील पट वाढवण्याची मोठी काळजी लागली आहे. सोशल मीडियाचा उपयोग करून लॉकडाऊनच्या काळात पालकांना गळ घातली जात आहे. यासाठी आपल्या शाळेत असलेल्या विविध सुविधांचे व्यवस्थित चित्रण करून पालकांना आकर्षित करण्याचा ऑनलाइन प्रयत्न होत आहे. शाळा सुरू होण्याच्या टप्प्यात प्रत्येक घरोघरी जाऊन विद्यार्थी शोधणारे शिक्षक आता पालकांचा मोबाईल क्रमांक शोधत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना या महाभंकर आजारामुळे देशासह संपुर्ण महाराष्ट्रात मोठा गोंधळ उडाला आहे. लॉकडाऊन, संचार बंदी, जमाबंदी आदी कठोर निर्णय सरकारकडून घेतले गेले. परंतु अशा परिस्थितच लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्यामुळे शिक्षकांची घालमेल वाढली आहे. साधारणपणे मे महिन्याच्या उत्तरार्धापासून शिक्षक विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी प्रत्येक घराचे उंबरठे झिजवतात. सध्या शाळांची संख्या अधिक व विद्यार्थी कमी अशी अवस्था झाल्यामुळे शिक्षकांना असे कृत्य केल्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली तर शिक्षकांचीही पद कमी होते. तसेच खासगी इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थी मिळाले नाही तर संस्थाचालक संबंधित शिक्षकाला कमी करून त्यांना वेतन देत नाहीत. यामुळे आपले पद व नोकरी वाचवण्यासाठी दोन्ही शाळांमधील शिक्षक  विद्यार्थी मिळवण्यासाठी जीवाचे रान करत असतात. मात्र सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्यामुळे शिक्षकांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत.
यामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर  उस्मानाबाद जिल्हयातील शिक्षकांनी चांगली शक्कल लावून सोशल मीडियाच्या माध्यमातुन जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असल्याचे दिसुन येत आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासोबत जास्तीत जास्त ऑडमिशन कशा प्रकारे आपल्या शाळेला मिळतील, यासाठी शिक्षकांनी कंबर  कसून पालकवर्गांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्यामुळे या दृष्टीकोनातुन जिल्हयातील शिक्षक आता ऑडमिशन प्राप्तीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातुन पालकवर्गांना आमच्या शाळेत कशा प्रकारे सर्वोत्तम सुविधा दिल्या जातात, कशा प्रकारे चांगले शिक्षण दिले जाते, शिक्षकांचा स्टाप कसा अनुभवी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना कसे सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून िदले आहे. लॉकडाऊनच्या काळात आम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकरे मिस करत आहोत. आदी संदर्भात भाविक व्हिडिओ, संदेश देऊन आमच्याच शाळेत आपल्या पाल्याचे ऑडमिशन करावे अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियांच्या माध्यातुन जिल्हयातील शिक्षक देत आहेत.
 पालकांना केले जात आहे माेहित
उस्मानाबाद जिल्हयातील शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी पालकांना मोहित करीत आहेत. त्यासाठी आता ते ह्या लॉकडाऊनच्या कार्यकाळात सोशल मीडियाचा वापर करताना दिसुन येत आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातुन सांगतात की, आमच्या शाळेत प्रवेशासाठी कोणत्याही प्रवेश चाचणीस सामोरे जावे लागत नाही, कसली ही प्रवेश फी नाही, उच्च प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद, शाळेतील वातावरण हे स्वच्छ, सुंदरा, व निसर्गरम्य आहे, ज्ञानरचनावादी पध्दीतीचा वापर, आय.एस.ओ मानांकित व डिजिटल वर्ग, ई-लर्निगचा वापर , अमुक श्रेणीतील शाळा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पध्दतीने शिकविले जाते तसेच शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते या सोबतच आमच्या शाळेत िनयोजनबध्द बाल मेलावा, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, पर्यावण भेटी,  मोफत पाठ्यपुतस्के, मौफत गणवेश आदी प्रकारचे आश्वासन देऊन पालकवर्गांना शिक्षक मोहित करण्याचा प्रयत्न करताना दिसुन येत आहेत.
 
Top