वाशी/प्रतिनिधी
 वाशी तालुक्यातील बनगरवाडी येथील सात ते आठ मुले आज दिनांक 3/5/2020 रोजी रोजच्याप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास गावालगतच असलेल्या विहिरी मध्ये पोहोण्यासाठी गेली होती.यावेळी विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन मुलांचा विहिरीचे काट ढासळल्यामुळे या विहिरी मध्येच दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. इतर पाच ते सहा मुले सुखरूप आहेत. या घटनेने बनगरवाडी गावासह तालुक्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,वाशी तालुक्यातील बीड सोलापूर महामार्गावर वाशी पासून जवळच विजोरा बनगरवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे.त्यामध्ये छोटीशी वस्ती असणाऱ्या बंगरवाडी येथील मुले शाळेला सुट्टी असलेल्या कारणाने रोज सकाळी गावालगतच असणाऱ्या बाबासाहेब महानवर यांच्या शेतातील विहिरीमध्ये गावातील मुले पोहोण्यासाठी रोजच जमा होत होती.रोजच्या प्रमाणे   सकाळी आठच्या सुमारास गावातील सात ते आठ विद्यार्थी विहिरीवर पोहोण्यासाठी जमा झाले. यावेळी गावातील इयत्ता सहावी मध्ये शिकणारे करण पिंटू बोडके वय बारा वर्ष व व विवेक आश्रुबा लांडगे वय बारा वर्ष हे दोघेही राहणार बनगरवाडी पोहून झाल्यानंतर त्याच विहिरीच्या काठावर बसले होते.यावेळी इतर गावातील विद्यार्थी विहिरीमध्ये पोहत होते, अचानक या विहिरीची दरड कोसळल्याने विहिरीच्या काठावर बसलेले करण पिंटू बोडके व विवेक आश्रुबा लांडगे दोघेही राहणार बनगरवाडी हे त्याच विहिरीतील माती व दगडाच्या ढिगाऱ्याखाली दबून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यावेळी विहिरीमध्ये पोहोणारे इतर पाच ते सहा जण घटना घडताच गावाकडे सैरावैरा पळू लागले.गावातील नागरिकांना याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती वाशी पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच वाशीचे तहसीलदार संदीप राजापुरे व पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे त्यांच्या  सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने या दोन्ही मयत मुलांना विहिरीच्या बाहेर काढून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी वाशी तालुक्यात पसरली असून तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top