उस्मानाबाद/ प्रतिनिधी
पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करूनही नियमांचे पालन होत नसल्यामुळे महसूल विभागाने धडक कारवाई करून उस्मानाबाद शहरातील पाच दुकानांना सील ठोकले. ही कारवाई नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांच्या पथकाने बुधवारी केली.
उस्मानाबाद शहरात संचारबंदीच्या नियमाचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सुरक्षित अंतर न ठेवता खरेदी करणे, दुकानांमध्ये गर्दी करणे असा प्रकार ग्राहकांकडून होत आहे. मात्र, दुकानदारही यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. दुकानासमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी खुणा न करणे, दुकानांच्या बाहेर भाव फलक न लावणे, ग्राहकांना शिस्त लावण्यासाठी बरॅकेटिंग न करणे अशाप्रकारे नियमांचा भंग दुकानदारांकडून होत आहे. यामुळे पोलिसांनी सातत्याने दंडात्मक कारवाया केल्या आहेत. दंड करूनही काही दुकानदार नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत. यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने या दुकानांना सील ठोकण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. त्यानुसार महसूलच्या पथकाने शहरातील विविध भागात असलेल्या पाच किराणा, मसाला दुकानांना सील ठोकले आहे. एक दुकान बंद असल्यामुळे कारवाई झाली नाही. यामध्ये गार्डे किराणा, सिद्धेश्वर किराणा, अभिजित मसाले, रुची मसाले व वन औषधी सेंटर, लज्जत मसाला व राईस सेंटर या दुकानांना सील करण्यात आले आहे. ही कारवाई नायब तहसीलदार मुस्तफा खोन्दे, मंडळ अधिकारी यु. एन. देशपांडे, तलाठी अर्चना कदम, आपत्ती व्यवस्था पण टीमने केली आहे. कारवाईमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. आता या दुकानदारांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत. यासाठी त्यांना त्यांच्याकडे अपील करावे लागणार आहे.

 
Top