उस्मानाबाद /प्रतिनिधी
कोरोना आजारा सोबतची खरी लढाई आता ग्रामीण भागात सुरू झालेली आहे  त्यामुळे संबंधित सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून  व  सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश  मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवार(दि .26 ) रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा, कोरोनासंदर्भात उपाययोजना व टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गोलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजयकर,  जिल्हा उपनिबंधक सहकार देशमुख, कृषी विकास अधिकारी  डॉक्टर तानाजी चिमनशेटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर आदी उपस्थित होते.
कोरोना विरुद्धच्या लढाईत अधिकारी व कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत आहेत मात्र आता ग्रामीण भागात कोरोना आजाराचे बाधित रुग्ण आढळून आल्याने आता खरी कसोटी सुरू झाली असून याचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा त्रागा न करता परस्परात योग्य तो समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.
यावर्षी वेळेवर व मुबलक पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच खताची कमतरता पडू नये त्यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री  गडाख यांनी दिले. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र जास्त असल्याने यासाठी महाबीज व इतर नोडल संस्थांनी  सोयाबीन बियाणे नियोजन करावे व शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे कमी पडणार नाही तसेच बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी विशेष भरारी पथके व दक्षता समिती मार्फत लक्ष ठेवण्यात यावे असे त्यांनी सूचित केले.
    रासायनिक खता बरोबरच सेंद्रिय खताचा वापर ही शेतकऱ्यांनी करावा, यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.  ज्या शेतकऱ्याचे नाव कर्जमाफी यादीत आहे, अशा शेतकऱ्यांना ही पीक कर्ज योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे असे सांगून पालकमंत्री गडाख यांनी टंचाईच्या सर्व उपायोजना जिल्ह्यात कार्यक्षमपणे राबवाव्यात असेही सूचित केले.पावसाळ्यापूर्वी सिंचन विहीरी, राष्ट्रीय पेयजल योजनेचे कामे पूर्ण करून घ्यावेत. सध्या कोरोना आजारामुळे महानगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात दाखल झाल्याने मनरेगा तून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
   यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व उपस्थित लोकप्रतिनिधींनी कोरोना, खरीप पूर्व हंगाम व टंचाईच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या व त्याबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.
 प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपायांची माहिती दिली. त्याप्रमाणेच खरीप हंगामाच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली तसेच त्यांच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत उपाययोजना राबविण्याचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
Top