५६ रुग्णांना घरी सोडले- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई / प्रतिनिधी - राज्यात कोरोनाबाधित ११३  नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८  झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज राज्यात १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज  झालेल्या मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद  येथील आहे.
1) कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली  येथील एका ६७ वर्षीय महिलेचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते.
2) कस्तुरबा रुग्णालयात एका ६४ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
3) नायर रुग्णालयात एका ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
4) के ई एम रुग्णालय मुंबई येथे एका ६० वर्षीय पुरुषाचा आज पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
5) कस्तुरबा रुग्णालयात एका ५२ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह  या आजारासोबत तो एच आय  व्ही बाधितही होता.
6) के ई एम रुग्णालय मुंबई येथे एका ७० वर्षीय महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा जुनाट आजार होता त्यामुळे ती डायलिसीसवर होती.
7) चेंबूर येथील एका खाजगी  रुग्णालयात एका ५५ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केला नव्हता तथापि तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतूकीसाठी विमानतळावर येत - जात असे.
8) कस्तुरबा रुग्णालयात एका ७७ वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह  हे आजार होते.
9) चेंबूर येथील खाजगी रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला.  या रुग्णाने परदेश प्रवास केलेला नव्हता. या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, अपस्मार अशा व्याधी होत्या. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता.
10) करोना बाधित रुग्णाची निकट सहवासित असलेल्या ६० वर्षीय महिलेचा काल मध्यरात्री पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते.
11) पुण्याच्या ससून रुग्णालयात ५२ वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्याला मधुमेहाचा त्रास होता.
12) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज एका ५८ वर्षाच्या बॅंक अधिका-याचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय्रोगाचा त्रास होता. नजीकच्या काळात मुंबई वगळता त्यांनी कोठेही प्रवास केलेला नव्हता.
13) जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे आज दुपारी एका ७७ वर्षीय आत्यंतिक स्थूल असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. शहरातील एका खाजगी रुग्णालयाने तिला संदर्भित केले होते.
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४५ झाली आहे.
*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील* :-
मुंबई   ४५८  ( मृत्यू ३०)
पुणे (शहर व ग्रामीण भाग)१०० ( मृत्यू ०५)
सांगली   २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा ८२ (मृत्यू ०६)
नागपूर          १७
अहमदनगर   २१
यवतमाळ,उस्मानाबाद प्रत्येकी ४
लातूर         ८
औरंगाबाद   ७   ( मृत्यू ०१)
बुलढाणा ५   ( मृत्यू ०१)
सातारा         ३
जळगाव       २  ( मृत्यू ०१)
कोल्हापूर, रत्नागिरी,  प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशीम, अमरावती (मृत्यू ०१), हिंगोली             प्रत्येकी १
इतर राज्य -                  २
*एकूण-७४८ त्यापैकी ५६ जणांना घरी सोडले तर ४५ जणांचा मृत्यू*
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ हजार ८ नमुन्यांपैकी १४ हजार ८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत ५६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६ हजार ५८६  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे. तर त्यांच्या निकटसहवासितांपैकी ५ जण पिंपरी चिंचवड येथे येथे करोना बाधित आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५१९ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण ३०७८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. 
.
 
Top