उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्गप्रतिबंधीत करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येत आपली माहितीस्वेच्छेने द्यावी असे आवाहन केले आहे.
दिल्ली येथील निजामोद्दीन मर्कज,पानिपत हरियाणा,राजस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झाल्यास नागरिकांनी स्वतःहन पुढे येत स्वतःची माहिती देऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे. प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरु केली असून अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे ( ९१४५५३१२३४),उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे (९९६०४२५८७०) यासह ०२४५२-२२२२७९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे.जे नागरिक जमात कार्यक्रमास सहभागी झाल्याची माहिती प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवतील व ते पुढे भविष्यात कोरोना बाधित आढळून आल्यास त्यांच्यावर जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल भारतीय दंड विधान १८६० च्या कलम २६९,२७०,१८८ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ज्या नागरिकांकडे अशा व्यक्तीची माहिती असेल त्यांनी सुद्धा हेल्पलाईनवर संपर्क साधून प्रशासनास माहिती देऊन सहकार्य करावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

 
Top