कळंब / प्रतिनिधी-
वैद्यकीय व्यवसायाबरोबर समाजातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य घटकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत पुढे येणारे डॉ. संदीप तांबारे व डॉ. पल्लवी तांबारे यांनी कोरोना विषाणू संसर्गाविरूद्ध प्रशासनामार्फत सुरू असलेल्या लढ्यात बाधितांची सेवा करण्यासाठी कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनवर्सन केंद्राची सुसज्ज इमारत समर्पित करून सामाजिक उत्तरदायित्त्व निभावले आहे.
कोरोना विषाणू (कोविड-19) संसर्गाच्या विळख्यात संपूर्ण जगासह भारत देशही सापडला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या विषाणू संसर्गाचा फैलाव वाढल्यास संशयित बाधितांवर उपचारासाठी प्रशासनामार्फत जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या इमारती अधिग्रहित करण्यात येत आहेत. यामध्ये उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी या तालुक्यांमधील निवासी शाळांची इमारत, वसतिगृहे आदींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तर कळंब तालुक्यातून एकमेव डॉ. संदीप तांबारे यांनी पुढाकार घेत येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनवर्सन केंद्राची सुसज्ज इमारत उपलब्ध करून देण्याची तयारी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे दर्शविली. त्यानुसार कळंब तालुका व परिसरात सध्या ही एकमेव इमारत कोरोना विषाणू संसर्गाचे संशयित अथवा बाधित रूग्णांवर उपचारासाठी ही इमारत सज्ज झाली आहे.
यापूर्वी शेतीमालाला हमीभाव, दुष्काळात पशुपालक शेतकर्‍यांच्या मदतीला धावून जात चारा छावण्यांची उभारणी, सेंद्रीय शेतीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारे डॉ. संदीप तांबारे आपल्या वैद्यकीय सेवेलाही तितकेच समर्पण देऊन काम करत आहेत. हेच यावरून अधोरेखित झाले आहे. त्यांच्या या कार्याचे कळंब तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात विविध स्तरातून कौतुक होत आहे.
 
Top