उमरगा/ प्रतिनिधी
तालुक्यातील नाईचाकुर येथील शेतमजूर दिनकर श्रीपती मेकाले (३०) रानडुकरांने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने परिसरात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शनिवारी (११) सायंकाळी साडेसहा वाजता नाईचाकुर शेत- शिवारात घडली आहे.जखमीवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुका व परिसरात रानडुकरांच्या उपद्रवाने शेतक-री व नागरिक त्रस्त झाले आहेत.सद्यस्थितीत शिवार परिसरात ज्वारी, गहू यासह अन्य पिकांची काढणी सुरू असून भाजीपाला व ऊसाला पाणी देण्यासाठी हि शेतकरी, शेतमजूर यांना सायंकाळी आणि रात्री विज पुरवठा सुरू होईल तेंव्हा शेतशिवारात पिकांचे काढणी व पाणी देण्यासाठी जावे लागते. तालुक्यात व परिसरात रानडुकरांची दहशत वाढल्याने ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रान डुकरांचा उपद्रव वाढल्याने पिकांची नासाडी होत असून मोठ्याप्रमाणावर नुकसान करत आहेत.आता तर थेट जीवघेणा हल्ला करीत आहेत. नाईचाकूरचे शेतकरी गोविंद माधव पवार यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास असलेले दिनकर मेकाले शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता दुसऱ्या सहकाऱ्यासह शेतातील ज्वारीला तारच कुंपण बांधत असताना शेतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला करून हाताला चावा घेतल्याने त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा निकामी झाला आहे, सोबत आणखी एक सहकारी असल्यामुळे आरडाओरडा केल्याने रानडुकर ऊसाच्या फडात घुसले.सोबतच्या व्यक्तीने तात्काळ उपचारासाठी शहरातील कानडे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून डॉ राजकुमार कानडे यांनी जखमी सुरक्षित असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग प्रादुर्भावाने लॉक डाऊन सुरू असून नागरिक घरातच असून शेतकरी, मजूर शेतशिवारातील कामे करण्यात व्यस्त असून यातच रानडुकरांच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने शिवारातील रानडुकरांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
Top