उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यातील नागरिकांना करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. यात जिल्हा परिषदही ग्रामपातळीवर जाऊन अहोरात्र काम करीत आहे. कोरोना आजारात जसा ताप असतो तसाच इन्फ्लुएन्झा, एच1एन1, सारी(SARI) अशा प्रकारच्या इतरही काही आजारांमध्ये रुग्णाला ताप येतो. विविध तापसदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तात्काळ वैद्यकीय तपासणी व्हावी व निदान व्हावे, याकरिता “मोबाईल फिवर क्लिनिक” ही अनोखी संकल्पना उस्मानाबाद जिल्ह्यातील  ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे.
 ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र असतील (साधारणतः 248 गावे),  ती गावे वगळून उर्वरित (साधारणतः 500) गावांमध्ये  एकूण वीस “मोबाईल फिवर क्लिनिक” पथके दि.13 एप्रिल,15 एप्रिल व 16 एप्रिल रोजी ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यास सुरुवात करणार आहेत.
 जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कार्यरत पथके ॲम्बुलन्ससह गावात हजर होतील. गावातील करोना सहायता कक्ष जवळच ते थांबतील. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, एएनएम यांनी माहिती दिलेल्या तापसदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची या पथकाद्वारे वैद्यकीय तपासणी केली जाईल. या कामासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका,एएनएम गावातील तापसदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतील व त्यांची माहिती या “मोबाईल फिवर क्लिनिक” पथकाला देण्याची मदत करतील.
ही सर्व यंत्रणा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित गावाचे सरपंच, इतर लोकप्रतिनिधी तसेच करोना सहायता कक्षातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वच्छता महत्व वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून कार्यरत राहील.

 
Top