उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जागतिक महामारीमुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत, जिल्हयातील दुधसंघ मागेच बंद पडले आहेत, त्यामुळे अशा अडचणीच्या काळात जिल्हयात निर्माण होणारे अतिरिक्त १ लाख लिटर दुध सरकार ने खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की,  कोरोना या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, सर्व बेकरी उत्पादने, खवा भट्ट्या बंद पडल्या आहेत. तसेच खाजगी दुध संघ संकलन केंद्र काही प्रमाणात दुध खरेदी करतात. त्यामुळे शेतीपुरक असलेला दुध धंदा पंधरा दिवसापासून आर्थिक अडचणीत आला आहे.
या दुध धंद्यावर अवलंबून असलेले हजारो शेतकरी, शेतमजूर व व्यवसायिकांना शिल्लक राहिलेल्या हजारो लिटर दुधामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. एकीकडे दुध विकले जात नाही. परंतू जनावरांचा चारा, पशुखाद्य, खुराक याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा खर्च कसा भागवायचा हा ज्वलंत प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. अचानक उद्भवलेल्या या आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत आहे.राज्य शासनाने अतिरिक्त दुध खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतू जिल्हा दुध संघ बंद असल्याने जवळपास एक लाख लिटर दुध अतिरिक्त दुध खरेदी नियमाच्या आड येत आहे. शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करुन शेतकऱ्यांचे शिल्लक दुध खरेदी करुन अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करावी व संकटातून वाचवावे. शासनाने याची गांभिर्याने दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दुधगावकरांनी दिला आहे.
 
Top