उस्मानाबाद  / प्रतिनिधी :- खरीप हंगाम 2020 जवळ आलेला असून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाकडून खरीपाचे नियोजन करण्यात आलेले आहे. कृषि विभागाकडून खरीपाचे 5 लाख 51 हजार 674 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 3 लाख 38 हजार 778 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. यासोबतच मका, तूर, उडीद, मुगाचीही सर्वाधिक पेरणी होईल. मात्र मृग नक्षत्रात चांगला पाऊस होऊन वेळेवर पेरणी झाल्यास उडीद व मुगाचे क्षेत्र वाढून सोयाबीन क्षेत्रात थोडी घट होऊ शकते. त्यादृष्टीने पुढील नियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक क्षेत्रातून 73 हजार 34 क्विंटल बियाणे व खाजगी क्षेत्रातून 48 हजार 985 क्विंटल बियाणे असे एकूण 1 लाख 22 हजार 20 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी  रासायनिक खताचे 62 हजार 650 मेट्रीक टनाचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे. रासायनिक खताचा जिल्ह्याचा सरासरी वापर 49 हजार 740 मेट्रीक टन असून  एप्रिल अखेरपर्यंत 28 हजार 884 मेट्रीक टन खते जिल्ह्यास उपलब्ध आहेत. 
उपलब्ध असणारे घरगुती सोयाबीन बियाणे उगवणशक्ती तपासून वापरणे तसेच पेरणीपुर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करणेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते , किटकनाशके या कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रे सकाळी  10 ते सायंकाळी  6 या वेळेत चालू ठेवण्याची मूभा मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे. तसेच या अनुषंगाने कृषि सेवा केंद्रावर खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी  व बियाणे, खते शेतकऱ्यांना गटामार्फत खरेदी करण्यासाठी कृषि विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.  तसेच लॉकडाऊनच्या काळात कृषि निविष्ठांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषि निविष्ठांची वाहतूक सुरु आहे. यामध्ये काही अडचणी आल्यास संबधित तालुका कृषि अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत निराकरण करण्यात येत आहे. 
कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर  1  व तालुकास्तरावर 8 असे एकूण 9 भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. या भरारी पथकाद्वारे सनियंत्रण करण्यात येत आहे. याअनुषंगाने कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रधारकांना मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनानूसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने सर्व कृषि निविष्ठा केंद्र, वितरकांनी   चांगल्या दर्जाच्या कृषि निविष्ठा पुरवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच  कृषि निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, पावतीवर विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन घ्यावी. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे वेस्टन, पिशवी व त्यातील  थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत. तसेच या संदर्भात तक्रार असल्यास तालुका तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी  केले आहे.
 
Top