आमदार सुजितिसंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली मागणी 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेते आणि वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांना सॅनिटायझर, हँडग्लोज, ओळखपत्र तसेच विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी भाजपा आ. सुजितसिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे १८ मार्च रोजी केली आहे.
कोरोना जंतूसंसर्ग विषाणूचा फैलाव ही राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी संपूर्ण देश व राज्यात लॉकडाऊन करावे लागले आहे. वर्तमानपत्र हे माणसाच्या जिवनातील महत्वाचा भाग झालेले आहे. सध्या लॉकडाऊन काळात राज्यातील सर्वच वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांनी कोरोना संकटाच्या भितीने वृत्तपत्र वितरणाचे काम बंद केले आहे. त्यामुळे अल्प मोबदल्यात वृत्तपत्र वितरण करणाऱ्या कामगाराच्या रोजी रोटीचाही प्रश्न आहे.
तरी महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेते आणि वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांना सॅनिटायझर, हँडग्लोज, ओळखपत्र तसेच विम्याचे संरक्षण दिले जावे. जेणेकरून राज्यातील वर्तमानपत्र वाचकांची गैरसोय दूर होईल आणि वर्तमानपत्र विक्रेते व वितरण करणाऱ्या कामगारांना सुरक्षितता व संरक्षण मिळेल, अशी मांगणी आमदार ठाकूर यांनी केली.

 
Top