भूम/प्रतिनिधी-
तालुक्यातील माणकेश्वर महसूल मंडळात, महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानातंर्गत विस्तारित समाधान योजनेचा यशस्वी कार्यक्रम झाला.  यामध्ये माणकेश्वर मंडळातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये भूम तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये बहुतांश विभागांनी त्यांच्या विभागामार्फत सुरू असलेल्या जनहितांच्या योजनेची माहिती दिली व प्राथमिक स्वरूपात लाभाथ्र्यांना लाभ देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने महसूल व वन विभाग , ग्रामविकास विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग ,सहकार विभाग, आरोग्य विभाग ,शिक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख इत्यादींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मनीषा राशींकर यांची उपस्थिती होती.  यावेळी  बापूसाहेब अंधारे , उपसभापती बालाजी गुंजाळ , तहसीलदार उषाकिरण शृंगारे , निवासी नायब तहसीलदार श्वेता अल्हाट, नायब तहसीलदार सावंत ,  नायब तहसीलदार राठोड व विविध विभागाचे कर्मचारी हजर होते. कार्यक्रमात काही लाभार्थी यांना एलपीजी गॅस, कर्जमुक्ती प्रमाणपत्र , संजय गांधी निराधार  अनुदान मंजुरी पत्र , शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले , वितरित करण्यात आले. कार्यक्रमस्थानी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांच्या बहुतांश समस्यांची सोडवणूक या कार्यक्रमात होत असल्याने नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळ अधिकारी श्री. स्वामी  व माणकेश्वर तलाठी एन.के.केदार यांनी विशेष मेहनत घेतली.

 
Top