आमदार ज्ञानराज चौगुले यांची पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी
उमरगा/ प्रतिनिधी -अचलबेट देवस्थान, कराळी-तुरोरी येथे उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील लातूर व कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा जिल्ह्यातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच दर गुरुवारी याठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. परंतु सध्या याठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. तसेच याठिकाणी मूलभूत सुविधांसह इतर विकासकामे केल्यास भाविक व पर्यटकांची संख्याही वाढू शकते. यामुळे अचलबेट देवस्थान येथे विविध मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांना भेटून पत्राद्वारे केलेली आहे. 
यामधून राष्ट्रीय महामार्ग ते अचलबेट देवस्थान पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे व दोन्ही बाजूने हायमास्ट वीज दिवे बसवणे, पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवणे, अचलबेट येथील तलावाचे सुशोभीकरण करून बगीचा तयार करणे, व इतर मूलभूत सुविधा पुरविणे या कामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
यावेळी आमदार विश्वजित कदम हे उपस्थित होते.
 
Top