उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा, खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस, अंगणवाड्या, महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, फिरते चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाटयगृहे, म्युझियम, 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, सर्वसामान्य नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केली आहे.
शासनाने संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम-2020 प्रसिध्द केले असून, यातील नियम
क्र.3 नुसार जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 लागू करण्यात आला आहे. व राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा -1897 अंतर्गत अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या विभागात अंतर्गत आरोग्य पथके तयार करून 24 तास कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आयसोलेटेड वॉर्ड तयार केले आहे. औषधे व साधनसामग्री उपलब्ध आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांची आयएमए मार्फत कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) येथे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. ते 24 तास तज्ज्ञ कर्मचाऱ्यांसह कार्यरत आहे. यासाठी संपर्क नंबर-20472-226927 हा आहे. नोडल ऑफिसर म्हणून अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील (मो-9422496580) स्थानिक व्यवस्था पाहतील व अंतर्गत संस्थांची व्यवस्था डॉ.सचिन बोडके (मो-9405236480) हे पाहतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष (0247-225618) क्रक्रमांकावर संपर्क साधू शकता. सर्व प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत मुख्याधिकारी यांनी आपले वॉर्ड, ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचा परिसर, अधिकारी  कर्मचा-यांनी शहरी भागापासून ते गावापर्यंत सर्व परिसर तसेच आपल्या अधिनस्थ असणारी कार्यालये, स्वच्छतागृहे आदी स्वच्छ ठेवावीत, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार वेळोवेळी फवारणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.                                               वा-याच्या गतीने पसरत आहेत अफवा
जिल्हयात अथवा कोणत्याही एखाद्या गावामध्ये कुण्या व्यक्तीस साधा खोकला अथवा सर्दी झाल्याचे समझल्यानंतर या संदर्भात मोठया रोचक पध्दतीने चर्चा घडवून वा-याच्या गतीने अफवा पसरविली जात आहे. जिल्हयातील १ लाखाहून अधिक लोक पुणे-मुंबई आदी शहरात नौकरी व अन्य कामासाठी राहत आहेत. परंतू कोरोना व्हायरस च्या वाढत्या अफवेमुळे व त्यास घबरून ते लोक आप-आपल्या गांवी परत येत आहेत.यापैकी कोणला सर्दी अथवा खोकला झाला असेल तर त्या संदर्भात अफवा पसरविण्यात येत आहे. त्यामुळे लोकांमध््ये भितीचे वातावरण पसरत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे यांनी सांगितले की, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक दिवशी ओपीडी सुरू आहे. येथे नियमित सर्दी, खोकल्याचे रूग्ण येत असतात, परंतु सर्दी,खोकला म्हणजे कोरोना व्हायरस नसतो, असेे त्यांनी सांगितले.

 
Top