उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशीम कोष खरेदीच्या बाजारपेठ ठप्प झाल्याने जिल्ह्यातील रेशीम उत्पादक अडचणीत सापडले होते.मात्र आता तेरणा रेशीम वस्त्र निर्मिती सहकारी संस्थेने ड्रायरची व्यवस्था केली असल्याने शेतकऱ्यांना आपले कोष ड्राय करून त्याची चांगला भाव मिळेपर्यंत साठवणूक करण्याची सोय होऊ शकेल, अशी माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी मोठया संख्येने रेशीम  शेतीकडे वळला आहे. सन २०१८-१९ वर्षात दुष्काळी परिस्थिती असताना मराठवाड्यात सर्वात जास्त कोष निर्मिती करण्याचा विक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. अशा परिस्थितीत यावर्षी देखील चांगले उत्पादन झाल्याने रेशीम उत्पादक खुशीत होता.
मात्र कोरोनाच्या साथी मुळे सबंध देशभर लॉकडाउन केल्याने कोष खरेदीच्या बाजारपेठ ठप्प झाल्या व शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला.शेतकऱ्यांना आपला कोष काढणीनंतर ४ दिवसाच्या आत बाजारात पाठवावा लागतो,जर उशीर झाला तर त्यातील अळीचे पाखरू होते व त्या कोषाला किंमत राहत नाही.
जिल्ह्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांनी रेशीम कोष आता कोठे व कसे विकायचे आणि त्याची साठवणूक कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला.या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधत आपली व्यथा मांडली. आ.पाटील यांनी त्याला तातडीने प्रतिसाद देत तेरणा रेशीम वस्त्र निर्मिती सहकारी संस्थेचे चेअरमन सुरेशभाऊ देशमुख यांच्याशी संपर्क साधत रेशीम शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत संस्थेच्या वतीने ड्रायरची सुविधा देत उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली. त्यांनी तातडीने दोन ड्रायर उपलब्ध करून देऊ असे सांगितले.
या अनुषंगाने काल दि.२७ मार्च रोजी तेरणा रेशिम वस्त्र निर्माण सहकारी संस्थेचे चेअरमन श्री.सुरेश देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील आई वाॅच फाउंडेशनचे बालाजी पवार, रेशिम आधिकारी वराट साहेब, सुजित मसे, बाळासाहेब घुटे ,पांडुरंग कुदळे यांच्या उपस्थित ड्रायर मशीन सुरू करून प्रात्यक्षिक करण्यात आले.
सदरील केंद्रावर २ ड्रायर असून प्रती ड्रायर १ टन कोष (१००० किलो) प्रती दिवस सुकवून देता येईल. रेशिम कोष सुकविल्यानंतर ४ महिन्या पर्यंत साठवून ठेवता येतो, केवळ ड्राय केलेला कोष उंदीर व मुंगी पासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
ड्रायर ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले कोष या संस्थेत आणून त्यातले ड्राय केल्यावर त्याची साठवणुक करणे सोपे होईल व चांगला भाव येईपर्यंत त्यांना आपला माल ठेवता येईल.त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी आपले कोष तेरणा रेशीम वस्त्र निर्मिती सहकारी संस्था,औरंगाबाद रोड,उपळा उड्डाण पुलाजवळ ,शिंगोली येथे ड्रायरच्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. अधिक माहिती साठी श्री. बाळासाहेब घुटे (9822443666) यांच्याशी संपर्क साधावा.

 
Top