
उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
परंडा उपजिल्हा रूग्णालय सुसज्ज करण्यासाठी भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी १५ लाख रूपयांचा िनधी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांंकरिता फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर यासाठी एकूण ५० लाख रुपयांपर्यंत निधी खर्चाबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, परंडा शहर उपजिल्हा रूग्णालय असलेले तालुक्याचे ठिकाण असूनही येथील एकाही शासकीय अथवा खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभाग नाही. अनेकदा गरीब व ग्रामीण भागातील रूग्णांना अन्य शहरांत पाठवावे लागते.
आयसीयू व्हेंटीलेटर, आयसोलेशन वार्ड- क्वारंटाईन वार्डची येथे व्यवस्था नाही. गंभीर परिस्थिती उद्भवल्यास आणि आणिबाणीच्या प्रसंगी शहर व तालुक्यातील गरीब रूग्णांचे, हाल होतात.
यासाठी माझ्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आयसीयु व्हेंटीलेटर, आयसोलेशन वाॅर्ड/ क्वारंटाईन व्यवस्था उभारण्यासाठी रू. १५.०० लक्ष निधी उपलब्ध करून दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही आवश्यकतेप्रमाणे इनफ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंट कीट्स, वैद्यकीय कर्मचा-यांकरिता फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर याकरिता एकूण रू. ५०.०० लक्ष पर्यंत निधी खर्चा बाबत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करून चर्चा झाली असल्याचे आ. ठाकूर यांनी मािहती दिली.
संवाद हवा, दंडुका नको - आमदार ठाकूर
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी संयम आणि संकल्प याची गरज आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश त्यासाठी निर्धाराने एकवटला आहे. जनतेला कोरोनाचे गांभीर्य ध्यानात आले आहे. मोदी यांनी जनतेला एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले तर एकही दंडुका न उगारता चौदा तास देश बंद झाला. त्यांनी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचे आवाहन केले तर लोक त्यालाही प्रतिसाद देत आहेत.
‘विरोधकांच्या डोक्यावर दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही,’ अशी धमकी दिली आहे. असल्या दंडुक्याच्या धमक्यांना भारतीय जनता पार्टी भीक घालत नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सरकारचे काय चुकते ते नेमके सांगितले तर त्यानुसार उपाययोजना करण्याच्या ऐवजी धमक्या कसल्या देता ? आमचे नेते लढवय्ये आहेत आणि आम्ही पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. सद्यस्थितीत दंडूका नसून संवादाची गरज आहे, असे मत आमदार ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.